मौजे लोणी काळभोर येथे ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह साजरा
Raju Tapal
November 20, 2021
70
मौजे लोणी काळभोर येथील रुपनर वस्ती ता.हवेली जि. पुणे येथे दिनांक.१७/११/२०२१ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ,मा.उपविभागीय कृषि अधिकारी,पुणे व तालुका कृषि अधिकारी हवेली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या वतीने ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताहा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.श्री सुनिल खैरनार, उपविभागीय कृषि अधिकारी, पुणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ऊस पाचट व्यवस्थापन चे महत्व विशद केले.सदर सप्ताहाच्या प्रसंगी त्यांनी मौजे लोणी काळभोर गावातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले की, ऊस तुटुन गेल्यानंतर ऊसाचे पाचट न जाळता पाचटाची कुट्टी करून जाग्यावरच पाचट कुजविण्याची प्रक्रिया करावी .त्यामुळे खोडवा ऊसाला मोठ्या प्रमाणावर जमिनीतुन सेंद्रीय कर्बाची उपलब्धता झाल्यामुळे जमिनीच्या सुपिकतेत वाढ होऊन ऊस पिकास आवश्यक असणारे सर्व अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होईल. तसेच ऊस पाचट व्यवस्थापन राबविल्यामुळे जमिनीच्या भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्मात सुधारणा होऊन ऊसाचे उत्पादन एकरी ६ ते ७ टनाने वाढ होऊन उत्पादन खर्चात बचत होईल.
श्री गुलाब कडलग ,मंडळ कृषि अधिकारी हडपसर,यांनी ऊस पाचट कुजविण्याची प्रक्रिया सविस्तर पणे विशद करताना एकरी ५ ते ६ टन ऊसाचे पाचट उपलब्ध होऊन २ ते ३ टन सेंद्रिय खत जागेवरच तयार झाल्यामुळे खोडवा ऊस पिकास ४० ते ५० किलो नत्र,२० ते ३० किलो स्फुरद,७५ ते १०० किलो पालाश उपलब्ध होऊन पिकाच्या वाढीत सुधारणा होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येईल.
श्री. मेघराज वाळुंजकर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-१ यांनी ऊसापासून उपलब्ध झालेले पाचट न जाळता पाचट कुट्टी मशीनने पाचट कुट्टी करून पाचट कुजविण्याची प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी जमीनीत ओलावा असताना एकरी ३२ किलो युरिया ,४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४ लिटर पाचट कुजविणारे जिवाणू चा अवलंब करणे बाबत मार्गदर्शन केले.तसेच पाचट कुट्टीचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.ऊस पिकाचे पाचट जाग्यावरच कुजविल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या पातळीत वाढ होऊन जमिनीचे आरोग्य सुधारून तापमान नियंत्रित होईल तसेच जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येईल, गांडुळांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन जमिनीतील हवा व पाणी यांचे प्रमाण योग्य राहील.त्यामुळे जमीन वापसा स्थितीत येऊन जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल तसेच खोडवा ऊस पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होईल.
श्रीमती मुक्ता गर्जे, कृषि सहाय्यक, लोणी काळभोर यांनी महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत राबविण्यात येत असलेल्या दि.१५/११/२०२१ ते २२/११/२०२१ सप्ताहाची माहीती उपस्थित शेतकऱ्यांना देऊन गावातील इतर सर्व शेतकऱ्यांनीही मोहीम स्वरुपात ऊस पाचट व्यवस्थापनाचा अवलंब करुन जमिनीच्या सुपिकतेत वाढ करुन कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त खोडवा ऊस पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
तसेच मा.श्री. सुनिल खैरनार, उपविभागीय कृषि अधिकारी यांनी लोणी काळभोर गावातील ठिबक सिंचन संचाची अनुदान पुर्व तपासणी करून उपस्थित शेतकरी यांना ठिबक सिंचनाचा अवलंब करूनच ऊस पिकाचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.ठिबक सिंचन पद्धती बरोबरच खोडवा ऊस पिकात पाचट व्यवस्थापन मोहीम राबविण्याबाबत त्यांनीउपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.गुलाब कडलग, मंडळ कृषि अधिकारी हडपसर, श्री मेघराज वाळुंजकर ,कृषि पर्यवेक्षक हडपसर-१,श्री रामदास डावखर, कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषि अधिकारी हडपसर यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये सदरच्या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती ज्योती हिरवे,कृषि सहाय्यक,श्री.संदिप ढवळे , कृषि सेवक,कृषि मित्र,श्री.दत्तात्रय काळभोर,श्री.भाऊसाहेब रुपनर ,श्री शरदचंद्र काळभोर व परिसरातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share This