• Total Visitor ( 133905 )

मोराला मारून शिजवलं मटण; शिकारी वन विभागाच्या जाळ्यात 

Raju tapal February 10, 2025 73

मोराला मारून शिजवलं मटण; शिकारी वन विभागाच्या जाळ्यात 

मोराची शिकार करून त्याचं मटण शिजवल्याची घटना कल्याण तालुकातील मौजे रुंदे गावात घडली. या प्रकरणी शिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय.

कल्याण :- जंगलात मोराची शिकार करून त्याचं मटण शिजवताना शिकारी वन विभागाच्या जाळ्यात अडकला. ही घटना ठाणे जिल्ह्यतील कल्याण तालुक्यामधील मौजे रुंदे गावात घडली. याप्रकरणी शिकाऱ्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती कल्याण वन विभागाचे अधिकारी आर चन्ने यांनी दिली. गणेश श्रावण फसाळे (वय-३५) असं अटक केलेल्या शिकाऱ्याचं नाव आहे.

 वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, "कल्याण तालुक्यातील मौजे रुंदे गावकडील जंगलात भारतीय मोरांची शिकार होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उप वनसंरक्षक, ठाणे (प्रा.), सहा. वनसंरक्षक (र.रा.प व वन्यजीव) ठाणे यांच्या मार्गदशनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी कल्याण, अधिनिस्त वन परिमंडळ खडवली, कल्याण परिक्षेत्राकडील पथक यांच्या समवेत तत्काळ मौजे रुंदे गावच्या पश्चिमेस वीट भट्टीवरील एका झोपडीत छापा टाकला." त्यावेळी आरोपी गणेश श्रावण फसाळेला ताब्यात घेतल्याची माहिती कल्याण वन विभागाचे अधिकारी आर चन्ने यांनी दिली.
 आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, जंगलातून शिकार करून आणलेल्या भारतीय मोराची पिसे आणि पातेल्यात शिजवलेलं मटण घटनास्थळी वन विभागाच्या पथकला दिसून आलं. त्यानंतर मोराचे पीस आणि शिजवलेलं मटण आणि काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि शनिवारी रात्री (८ फ्रेब्रुवारी) आरोपीला चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती आर चन्ने यांनी दिली.
"रविवारी सकाळी (९ फ्रेब्रुवारी) आरोपीची आधिकची चौकशी केली असता, सदर नोंद गुन्ह्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळं त्याला अटक केली. रविवारी सुट्टीच्या विशेष न्यायदंडाधिकारी, कल्याण न्यायालयात हजर केलं असता ३ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती, वन विभागाकडून देण्यात आली. तर अटक शिकाऱ्यानं आणखी असेच या सारखे गुन्हे केले आहेत का? याचा पुढील तपास कल्याण वन विभागातील अधिकारी करत आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement