नवीन चिकन विक्री दुकानावर प्रभाग ४ जे ची धडक कारवाई !
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुत्र्याच्या छत्री प्रमाणे प्रती दिन कुठे ना कुठे चिकन विक्रीचे दुकान निर्माण होत आहे, अशाच प्रकारातून प्रभाग ४ जे अंतर्गत तिसगांव प्रवेश द्वारा समोरील पदपथावर कालच निर्माण झालेल्या नवीन चिकन विक्री दुकानावर प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ हेमा मुंबरकर यांनी धडक कारवाई करून हे दुकान बंद केले आहे .
प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या पूणे लिंक रोड वरील तिसगांव प्रवेश द्वारा समोरच एकास एक लागून असे तीन अनधिकृत चिकन विक्रीची दुकाने आहेत . या विक्रेत्यांकडे कसल्याही प्रकारचे अधिकृत परवाने नसल्याचे समजते . याच तिन चिकन विक्री दुकानाला लागूनच दि . १७ मे २०२२ रोजी आणखी एक चौथे अनधिकृत चिकन विक्रीचे दुकान निर्माण झाल्याचे सहाय्यक आयुक्त सौ . हेमा मुंबरकर यांच्या निदर्शनास आल्या नंतर या दुकानावर १८ मे रोजी सायंकाळी कारवाई करून हे दुकान तोडण्यात आल्याचे सौ . हेमा मुंबरकर यांनी सांगितले . तसेच याच ठिकाणच्या अन्य तीन चिकन विक्रेत्यांनाही दुकाने काढून घेण्याची सुचना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले .
याच कारवाई दरम्यान तिसगांव नाक्यावर भर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या एका टपरी वरही कारवाई करुन या टपरी धारकाचे काही साहित्य जप्त करण्यात आले आहे .
शहर विद्रुपीकरण आणि अस्वच्छतेत भर टाकणारी अशी पालिका क्षेत्रात असंख्य अनधिकृत आणि बेकायदेशीर चिकन विक्रीची दुकाने असून या सर्व दुकानांची अधिकृतता तपासून त्यांचेवरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरीकांत बोलले जात आहे .