नेवरी येथील अपघातात डोंगरसोनी येथील दाम्पत्यासह विट्यातील तरूण जागीच ठार
कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शुक्रवारी पहाटे दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील दाम्पत्यासह विट्यातील तरूण जागीच ठार झाला.
कपिल माणिक झांबरे ,धनश्री झांबरे दोघेही रा. डोंगरसोनी ता.तासगाव अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे असून सुदर्शन गजानन निकम रा.विटा असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.
विटा येथील पालिकेचे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचा मुलगा सुदर्शन निकम व संग्राम संजय गायकवाड हे दोघे शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील खेराडे गावाकडून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल माणिक झांबरे हे पत्नी धनश्री अन्य नातेवाईकांसह तासगावहून पुण्याकडे निघाले होते. नेवरीजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.प्रज्वल पुंडलिक झांबरे हे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सांगली येथील रूग्णालयात पाठविण्यात आले.
कडेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दुस-या अपघातात नगर - दौंड महामार्गावरील विसापूर शिवारात दुचाकी - स्विफ्ट कारच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले.
लोणी व्यंकनाथ येथील शफीक शेख हे पत्नीसोबत दुचाकीवरून नगरच्या दिशेने जात होते. विसापूर फाट्याजवळ त्यांची दुचाकी आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने.जोरात धडक दिल्याने शेख यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या. तर शफीक शेख गंभीर जखमी झाल्याने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच शफीक शेख यांची प्राणज्योत मालवली.
या अपघाताचे वृत्त समजताच लोणी व्यंकनाथ गावावर शोककळा पसरली.