पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Raju Tapal
December 04, 2021
70
पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणा-या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, ,शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे अशी माहिती शिरूर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.नवनाथ पडवळ यांनी दिली.
याबरोबरच जिल्ह्यास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानूसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
त्यानूसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई, म्हशींचे वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१ - २२ या वर्षात राबविली जाणार आहे.
त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक ,युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास विस्तार अधिकारी , पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अथवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त कार्यालय तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय नजीकघ्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन शिरूर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.नवनाथ पडवळ यांनी केले आहे.
Share This