पत्नी व मुलीचा अज्ञात कारणावरून डोक्यात घाव घालून पतीने निर्घूण खून करण्याची घटना भिलारवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे सोमवार दि.८ नोव्हेंबरला सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
लक्ष्मी अण्णा माने वय -३० वर्षे ,श्रुती अण्णा माने वय - १२ वर्षे रा.दोघीही भिलारवाडी ता.करमाळा जि.सोलापूर अशी खून करण्यात आलेल्या आई व मुलीचे नाव आहे.
अण्णा भास्कर माने रा.भिलारवाडी ता.करमाळा जि.सोलापूर असे संशयित आरोपीचे नाव असून घटनेनंतर त्याने पलायन केले.
या घटनेची फिर्याद कमलेश गोपाळ चोपडे वय - ३० रा.देवळाली ता. करमाळा जि.सोलापूर याने करमाळा पोलीसांत दिली.
हा प्रकार सोमवार दि.८/११/२०२१ रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मौजे भिलारवाडी येथील मृतांच्या राहात्या घरात उघडकीस आला.
संशयित आरोपी आण्णा माने मयत लक्ष्मी माने, श्रुती माने मुलगा रोहित माने व मृतांची सासू हे एकत्रित भिलारवाडी येथे राहाण्यास असून दोन्ही मृत व संशयित आरोपी आण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटरसायकलवरून निघून गेल्याचे मुलगा रोहित माने याने पाहिले होते. त्यानंतर सकाळी लक्ष्मी व श्रुती या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.
त्यामुळे आण्णा माने अज्ञात हत्याराने अज्ञात कारणावरून दोघींच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे.ठार मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यानुसार लक्ष्मीचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी आण्णा मानेच्या विरोधात दोन खून केल्याची फिर्याद दिली.
करमाळा पोलीसांनी आण्णा माने याच्या तपासासाठी तीन पथके पाठविली असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर करत आहेत.