पिक अप- हायवा ट्रकच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार ; बेल्हे बाह्यवळण चौकातील घटना
पिक अप -हायवा ट्रकच्या समोरासमोर धडकेत एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दि.१९ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील बेल्हे बाह्यवळण चौकात घडली.
राहूल गोपीनाथ रायकर वय ३५ रा.पारगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये हायवा ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळेफाट्याकडून पारनेरकडे जाणारा राख भरलेला एम एच १५ जी.व्ही.३६६० या क्रमांकाचा हायवा ट्रक बेल्हे गावाजवळ असलेल्या बाह्यवळण चौकातून पारनेर या ठिकाणी जाण्यासाठी वळत असताना नगरहून आळेफाट्याकडे जाणा-या एम एच १६ सीसी ६९१९ या क्रमांकाच्या पिक अपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पिक अप चालकाचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर हायवा ट्रकचालक ट्रक जागेवर सोडून पसार झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार अपघाताचा तपास करत आहेत.