निमगाव म्हाळुंगी रस्त्यावर खड्डे
शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील कासारी फाट्यावरून निमगाव म्हाळुंगी गावाकडे जाणा-या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असून निमगाव म्हाळुंगी गावात श्री.म्हसोबा शिक्षण संस्थेचे विद्या विकास मंदीर विद्यालय तसेच बबईताई टाकळकर आश्रमशाळा आहे. परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत. निमगाव म्हाळुंगी गावातील ग्रामस्थ,प्रवासी शिक्रापूर तसेच पुण्याकडे जाण्या- येण्यासाठी निमगाव म्हाळुंगी ते कासारी फाटा या रस्त्याचा वापर करत असतात. निमगाव म्हाळुंगी गावावरून कासारी फाट्याकडे जाणारा रस्ता नगर-पुणे महामार्गाला जोडलेला आहे. या रस्त्याची काही ठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झालेली आहे. कोंढापुरी येथे अनेक कंपन्या,कारखाने असल्यामुळे निमगाव म्हाळुंगी गावातील कंपन्यांतील कामगार वर्ग कोंढापुरी गावाकडे येण्या -जाण्यासाठी या रस्त्याचा दैनंदिन वापर करत असतात. प्रवाशांचे हित लक्षात घेवून निमगाव म्हाळुंगी-कासारी फाटा रस्त्यावर पडलेले खड्डे डांबर मिश्रित खडीने बुजवून रस्त्याची दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे.