• Total Visitor ( 84620 )

प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यातून ५ कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

Raju tapal October 22, 2024 62

प्रचार सुरू होण्याआधीच पुण्यातून ५ कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची पकडली रोकड

इनोव्हा क्रिस्टाकार सत्तेतील बड्या आमदाराची?

पुणे:-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार निश्चितीसाठी जोर बैठका सुरू आहेत. पुढच्या काही तासांत पक्षांच्या उमेदवारी याद्या यायला सुरुवात होईल.राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली.त्यानुसार राजगड पोलिसांनी संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये तब्बल ५ कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली. तसेच सदर वाहन हे सत्तेतील एका बड्या आमदाराचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे निवडणुकीतला पैशांचा वापर कमी व्हावा, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करीत असताना राजकीय पक्षांकडून वा नेत्यांकडून मात्र जनतेला 'लक्ष्मी दर्शन' होईल याची पुरेपूर सोय करण्यात येते आहे. याचाच प्रत्यय निवडणूक काळात कोट्यवधी रुपये जप्त होत असलेल्या कारवाईच्या वृत्तांनी येतो आहे.

सदर रक्कम आणि इनोव्हा क्रिस्टा कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एमएच ४५ एएस २५२६ पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग तसेच तहसिलदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले आहेत. तसेच आयकर विभाग, फाईंग स्कॉड देखील भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. सदर वाहनात चार व्यक्ती असून यामध्ये एकजण संबंधित आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा २० नोव्हेंबरला मतदान,तर २३ नोव्हेंबरला निकाल

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यांत राज्यात मतदान पार पडेल तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी विद्यमान महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार असल्याने २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना वेगवान हालचाली कराव्या लागतील.
 

Share This

titwala-news

Advertisement