राजुरी ता.जुन्नर शिवारात बिबट्या जेरबंद
राजुरी ता.जुन्नर शिवारातील गोगडी मळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात मंगळवारी दि.१५ फेब्रुवारीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला.
राजुरी शिवारातील गोगडी मळा, दुर्गामातानगर येथे शनिवारी सकाळच्या सुमारास उमेश नायकवडी यांच्या शेतात सव्वा वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने बिबट्याचा वावर असलेल्या या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता.
मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला.
नितीन औटी, आनंद नायकोडी , संजय नायकोडी, समीर औटी, तुकाराम औटी यांच्या ही घटना निदर्शनास आल्यावर वनविभागाला ही माहिती देण्यात आली.
वनपरिक्षेत्राचे वनपाल संतोष साळूंखे, वनरक्षक त्र्यंबक जगताप, स्वप्निल हाडवळे घटनास्थळी आले. त्यांनी चार वर्षे वयाच्या मादी जातीच्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविले.