कोंढापुरी येथे रमजान ईद साजरी
शिरूर :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे मुस्लिम धर्मियांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कोंढापुरी येथील सिकंदर मणेर कुटूंबियांकडून कोंढापुरी येथील ग्रामस्थांना शिरखुर्माचे वाटप करण्यात आले.
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, टिटवाळा न्यूज चे शिरूर तालुका प्रतिनिधी, पत्रकार विजयराव ढमढेरे, बागायतदार शेतकरी प्रकाशराव खलाटे,अमितराव गोसावी ( नातेपुते, पंढरपूर),साहिल मणेर तसेच लहान मुले,मुली यावेळी उपस्थित होते.
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, टिटवाळा न्यूज चे शिरूर तालुका प्रतिनिधी, पत्रकार विजयराव ढमढेरे यांनी सिकंदर मणेर कुटूंबियांना रमजान ईद निमित्त "रमजान ईद मुबारक हो" अशा शुभेच्छा दिल्या.
रमजान ईद सणाची माहिती देताना सिकंदर मणेर यांनी टिटवाळा न्यूज ला सांगितले, रमजान ईदला ईद-उल -फितर असेही म्हणतात.हा इस्लाममधील महत्वाचा सण आहे.हा सण रमजान महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी साजरा केला जातो.ईदच्या दिवशी सकाळी विशेष नमाज अदा केली जाते.या दिवशी मुसलमान उपवास सोडतात.आनंदाने हा सण साजरा करतात.ईद -उल -फितर हा इस्लामिक चंद्र कॅलेंडरच्या दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.हा सण रमजानच्या पवित्र उपवासानंतर आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जातो.ईदच्या दिवशी फितर दान गरजू लोकांना देणे अनिवार्य असते.
ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मिय नवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.या दिवशी गोड पदार्थ विशेषतः शिरखुर्मा बनविला जातो.ईद हा आनंद बंधुत्व आणि आणि परस्पर प्रेमाचा सण मानला जातो.कुटूंबासोबत आणि मित्रांसोबत हा सण साजरा केला जातो.रमजान ईद मुस्लिम धर्मियांसाठी केवळ सण नसून श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचे प्रतिक आहे.रमजान महिन्यात उपवास/रोजा ठेवणे ईस्लामच्या पाच स्तंभापैकी एक आहे. रोजा सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न,पाणी आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा संकल्प असतो. उपवासाची सुरूवात सकाळी सुर्योदयापूर्वीच्या भोजनाने होते.उपवास संपविण्यासाठी "इफ्तार"( सुर्यास्तानंतरचे भोजन )घेतले जाते.रमजानदरम्यान मुस्लिम धर्मिय प्रार्थना,कुराण पठण आणि दान धर्म करतात.या महिन्यात अल्लाहने कुराण प्रेषित मुहम्मद साहेबांना प्रकट केले असे सिकंदर मणेर यांनी सांगितले