• Total Visitor ( 84951 )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला 10 वर्षांची शिक्षा

Raju Tapal January 12, 2023 77

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराला 10 वर्षांची शिक्षा;हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात दोषी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीत सध्या भर पडत आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना दुसरीकडे पक्षाच्या खासदाराविरोधात गुन्हा सिद्ध झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैझल यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.
लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती प्रकरणाशी संबंधित वकिलांनी दिली.वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार आणि इतर आरोपींनी 2009 मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान एका राजकीय मुद्यावरून माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर खासदार फैजल आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता कोर्टाने निकाल सुनावला आहे.
कोर्टाने दिलेल्या निकालाला खासदार फैजल उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी ही बाब राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात अपील करून आव्हान देणार असल्याचे खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले.

कोण आहेत खासदार मोहम्मद फैजल

मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. मोहम्मद फैजल हे 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभा खासदार म्हणून 16 व्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 2014-2016 या कालावधीत ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.
मोहम्मद फैजल 2019 मधील लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून पुन्हा निवडून आले. सध्या ते कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्यायविषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत. याशिवाय, 13 सप्टेंबर 2019 रोजी ते अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. खासदार फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार आहेत.

Share This

titwala-news

Advertisement