महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटना विरहीत एस टी कर्मचा-यांच्या समर्थनार्थ बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय महासचिव ऍड. राहूल मखरे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टि.वाय मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनाप्रसंगी बोलताना ऍड. राहूल मखरे म्हणाले, २८ ऑक्टोबर२०२१ पासून एस टी महामंडळाच्या कर्मचा-यांनी निरंतर आंदोलन सुरू केले आहे.
राज्य शासन व एस टी प्रशासनाने त्यांच्या मागण्या मंजूर न केल्याने आजपर्यंत एस टी च्या ३६ कर्मचा-यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्य शासन ,एस टी प्रशासनाचा बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करत आहोत. एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, एस टी को ऑपरेटिव्ह बँकेची कर्जमाफी करावी, आत्महत्याग्रस्त कर्मचा-याच्या परिवारास त्वरीत किमान ५० लाख रूपये द्यावेत. एस टी ची जाचक नियमावली रद्द करून त्यात काळानुरूप बदल करावेत .एस टी कर्मचा-यांचे प्रलंबित करार पूर्ण करावेत या कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. या कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी राज्यात सर्वप्रथम आम्ही रस्त्यावर आलो आहे. येत्या दोन दिवसात शासनाने या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
संजय शिंदे यावेळी बोलताना म्हणाले ,सुरक्षित प्रवासासाठी सर्वजण एस टी प्रवासास प्राधान्य देतात. त्यामुळे एस टी त ज्यादा सुविधा देण्याऐवजी खाजगीकरण करण्याचा सरकार प्रयत्न करत असून कामगारांची गळचेपी प्रयत्न सुरू आहे.तो कदापी यशस्वी होवू दिला जाणार नाही.
बहुथश मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, राहूल शिंगाडे, वसीम शेख, सुरज धाइंजे, ऍड. किरण लोंढे, भारत मिसाळ यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनामुळे इंदापूर शहरातून जाणा-या जुन्या पुणे - सोलापूर महामार्गावर वाहनांची दुतर्फा गर्दी झाली होती.त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली.
* महाराष्ट्र शासन राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एस टी आगारातील १६३ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे दौंड आगाराचे कामकाज पुर्णपणे ठप्प झाले आहे.
दत्तात्रय तिगोटे, अमोल पवार, अमोल आटोळे, शैलेश मोरे, गणेश जागडे, पांडूरंग काटे, अंकुश तुरे, प्रवीण कारंडे, राजेंद्र लडकत, शिवाजी कदम जगन्नाथ खराडे यांच्या नेतृत्वाखाली दौंड आगारातील कर्मचारी राथ्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत.
संपामुळे दौंड - पाटस, चोफुला - दौंड, कुरकुंभ - बारामती, दौंड - काष्टी, नगर - दौंड - चौफुला- बारामती आदी मार्गावरील एस टी बससेवा पूर्णपणे खंडीत झाली. दौंड आगारातून औरंगाबाद,नगर,पुणे, सातारा,शिर्डी,जळगाव, कोल्हापूर येथे जाणा-या एस टी बस जावू शकल्या नाहीत. दिवाळीची सुट्टी संपवून पुणे, मुंबई, नगरकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले.दौंड आगारात संपामुळे सुमारे ४० फे-या होवू शकल्या नाहीत.
* तळेगाव दाभाडे आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
या संपाला तळेगाव दाभाडे येथील उद्योजक ,जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी पाठिंबा दिला असून संप मिटेपर्यंत संपामध्ये सहभागी झालेल्या तळेगाव दाभाडे आगारातील कामगारांच्या वैद्यकीय तसेच दोन वेळची जेवणाची सोय केली आहे.