सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या सतर्कतेमुळे युवतीला जीवदान ; कोरेगाव भीमा ता.शिरूर येथील घटना
शिक्रापूर येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांच्या सतर्कतेमुळे शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील एका युवतीचा आत्महत्येचा डाव फसला असून सदर युवतीला पोलीस अधिका-याच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.
शिक्रापूर ता.शिरूर येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे कोरेगाव भीमा परिसरात कंपनीत घडलेल्या चोरीचा तपास करण्यासाठी गेले होते.
कंपनीच्या पाठीमागील बाजूने कंपनीची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना भीमा नदीच्या कडेला निर्जनस्थळी एक युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. सदर युवतीची पानसरे यांनी विचारपूस केली असता सदर युवती वेगवेगळी उत्तरे देवू लागली. पानसरे यांनी सदर युवतीला विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता तिने रडत रडत सांगितले आम्ही कोरेगाव भीमा येथे राहात असून मी घरगुती कारणामुळे या ठिकाणी नदी,विहीरीमध्ये आत्महत्या करण्यासाठी आले असल्याचे सांगितले.
जितेंद्र पानसरे यांनी सदर युवतीला धीर देत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांना फोन करून माहिती देवून बोलावून घेतले. युवतीसह तिच्या नातेवाईकांची समजूत काढून नातेवाईकांच्या ताब्यात सदर युवतीला दिले.सदर युवतीच्या नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे देवदुताप्रमाणे उभे ठाकल्याने त्यांचे आभार मानले.