*सकारात्मक पत्रकारितेचा वसा*
*- वसंतराव मुंडे*
वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात. वृत्तपत्र म्हटले की, पत्रकार डोळयासमोर उभा राहतो. त्यातही काही पत्रकार आपल्या लेखन कौशल्यामुळे कायमच स्मरणात राहतात. यापैकी एक माझे मित्र वसंतराव मुंडे ... त्यांना मी गेल्या तीस वर्षापासून ओळखतो. अजातशत्रू, निश्चयी पत्रकार असलेल्या वसंतरावांची लेखनशैली वैशिष्टयपूर्ण आहे. कोणत्याही घटनेवर नेमकेपणाने भाष्य करणे ही त्यांची खासीयत. प्रसंगानुरुप आपल्या लेखणीद्वारे मवाळ तसेच जहालपणे टीका करुन समोरच्याच्या अवगूणांवर प्रकाश टाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. चौफेर लिखाण करणाऱ्या मोजक्या पत्रकारांमध्ये वसंतरावांचा समावेश होतो.
वसंतराव तटस्थपणे समाजासमोर बातमीच्या माध्यमातून सत्य मांडतात असा माझा अनुभव आहे. सामाजिक, धार्मिक व राजकीय अशा सर्व क्षेत्रांची त्यांना माहिती असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. या गुणांमुळे त्यांनी जिज्ञासू पत्रकार म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आपले वेगळेपण जपत, पत्रकार, प्रतिनिधी, वृत्तपत्र वितरक, कर्मचारी, संपादक यांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. या माध्यमातून त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. तसेच
राज्यकर्ते, अधिकारी व पत्रकार यांच्यात योग्य समन्वय साधून त्यांनी संघटनात्मक कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली याचा मी साक्षीदार आहे.
दैनिक मराठवाडा साथी, दैनिक विवेकसिंधू व इतर वृत्तपत्रांमधून त्यांनी आपली पत्रकारितीची सुरुवात केली. कष्ट आणि प्रचंड मेहनत करण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. यामुळे त्यांनी संकटावर नेहमीच मात केली असून बीडसारख्या ग्रामीण भागातून येऊन आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्यस्तरीय पातळीवर आपल्या कार्याचा मोठा ठसा त्यांनी उमटविला आहे.हे खास वैशिष्ट्य... तसेच विभागीय अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत.
अशा व्यासंगी पत्रकार मित्रास त निरोगी व दिर्घायुष्य लाभो अशा माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
Happy birthday Vasantrao..
....
*डॉ.राजू पाटोदकर* उपसंचालक (माहिती) पुणे विभाग,पुणे