समई ,थाळी नृत्यांगना संध्या माने- सोलापूरकर काळाच्या पडद्याआड
शिरूर:-
जेष्ठ तमाशा कलावंत,फडमालक संध्या माने -सोलापूरकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या स्व.विठाबाई नारायणगावकर यांच्या त्या द्वितीय कन्या , प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे, मालती इनामदार,भारती सोनवणे या त्यांच्या भगिनी असून फडमालक कैलास,विजय, राजू नारायणगावकर हे त्यांचे बंधू आहेत.
मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशात वयाच्या १० व्या वर्षांपासून नृत्यांगना म्हणून काम करण्यास संध्या माने यांनी सुरूवात केली. समई नृत्यांगना म्हणून राज्याच्या कानाकोप-यात त्या परिचित झाल्या. सोलापूरचे रहिवासी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकीवादक रमेश माने यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतः:चां नवीन फड तयार केला.
पतीच्या निधनानंतरही मुले रोहन ,सुरेश सोलापूरकर यांच्या मदतीने त्यांनी तमाशा फड सुरू ठेवला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२० साली माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तमाशा सम्राज्ञी विठाबाई जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
चिकनगुनिया आजार झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाल्याचे समजते.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे)