आर्थिक अडचणीमुळे सावकाराला लिहून दिलेली जमिन पोलीस निरीक्षकांमुळे परत मिळण्याची घटना कर्जत तालुक्यातील भोसे येथे घडली.
कर्जत तालुक्यातील भोसे येथील शेतकरी नितीन नामदेव क्षीरसागर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे भोसे येथील एका सावकाराकडून सन २०१६ साली ३ लाख रूपये ३ टक्के व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात त्या सावकाराने त्यांच्याकडून १ एकर जमिन पैसे परत देण्याच्या बोलीवर लिहून घेतली होती. त्यानंतर क्षीरसागर यांनी मध्यंतरीच्या काळात २ लाख २० हजार रूपये सावकाराला दिले. सावकार आणखी ६ लाख ५० हजार रूपयांची मागणी करत होता. मी तुम्हाला भरपूर पैसे दिलेत. आणखी ४ लाख रूपये देतो. माझी जमीन मला परत करा अशी क्षीरसागर यांनी सावकाराला विनंती केली.
३ लाखाचे ६ लाख २० हजार रूपये देत असूनही सावकार जमीन देण्यास नकार देत होता.
हतबल झाल्यानंतर क्षीरसागर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना हकीकत सांगितली.
यादव यांनी पोलीस अंमलदार सुनील माळशिखरे , मनोज लातूरकर, अमित बर्डे, भाऊसाहेब यमगर यांना सावकाराला बोलावून घेण्याचे आदेश दिले. यादव यांच्या धसक्याने सावकाराची नियत बदलून मी लगेच जमीन परत करतो असे सावकाराने सांगितले. दि.१७ नोव्हेबरला संबंधित सावकाराने जमीन भोसे येथील नितीन क्षीरसागर या शेतक-याला परत केली . जमीन परत मिळाल्याबद्दल संबंधित शेतक-याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सहका-यांचे आभार मानले.