शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७ उत्साहात साजरा होणार
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत;अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग
ठाणे :- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त जिल्हा परिषद ठाणेमार्फत १५ जून,२०२६ रोजी जिल्हाभरात ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी,प्रेरणादायी आणि संस्मरणीय व्हावा यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी ही माहिती दिली. शाळा प्रवेशोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी,सनदी अधिकारी,शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवेशोत्सवाच्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार असून ‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेऊन त्याची प्रत पालकांना स्मृतीचिन्ह म्हणून देण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी परिसराची स्वच्छता,पालक व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती,विद्यार्थ्यांची प्रभातफेरी,तिथी भोजनाचे आयोजन तसेच शाळेचा पहिला दिवस उत्सवासारखा साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच शैक्षणिक गुणवत्ता, निपुण महाराष्ट्र अभियान,शालेय भौतिक सुविधा,स्वच्छता,विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी सवयी,क्रीडा साहित्य,प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी शाळांना भेट देऊन धोकादायक इमारती,वापराअभावी किंवा पाण्याअभावी बंद असलेली शौचालये,इतर मूलभूत सुविधांमधील त्रुटी यांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देणार आहेत. तसेच शाळेतील ‘पिंक रूम’,अंगणवाडीची उपलब्धता, शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे नियोजन आणि पटसंख्या वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष उपक्रमांचाही आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक दाखलपात्र विद्यार्थी शाळेत प्रवेशित झाला आहे का,याची खात्री करून १०० टक्के प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळांनी केलेल्या प्रयत्नांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. भेटीदरम्यान आढळलेल्या चांगल्या बाबी,त्रुटी आणि सकारात्मक सूचना शेरेपुस्तकात नोंदवून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्यात आल्या असून,वर्षभर त्या शाळांना नियमित भेटी देऊन विविध बाबींचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दत्तक शाळांना भेट देताना अधिकारी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता,भौतिक सुविधा,खेळाची मैदाने व साहित्य, शाळेतील पूरक व्यवस्था,स्वच्छता,शालेय पोषण आहार,विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी तसेच शाळेच्या एकूण व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेणार आहेत. आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या जाणार आहेत. “शाळा प्रवेशोत्सव हा केवळ विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम नसून दर्जेदार शिक्षण,पालकांचा विश्वास आणि समाजाच्या सहभागातून शिक्षणव्यवस्थेला बळकटी देण्याचा एक व्यापक उपक्रम आहे. प्रत्येक बालक शाळेत दाखल होऊन आनंददायी वातावरणात शिक्षण घेईल, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कटिबद्ध आहे. अधिकारी,लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ आणि पालक यांच्या संयुक्त सहभागातून जिल्हा परिषद शाळांना अधिक सक्षम,गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित बनविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सर्व अधिकारी,कर्मचारी,लोकप्रतिनिधी,पालक व ग्रामस्थांना शाळा प्रवेशोत्सवात सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक बालकाच्या शिक्षणाच्या प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.