जेष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे पुण्यात निधन
शिरूर :- जेष्ठ पत्रकार रामचंद्र आण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात नुकतेच निधन झाले.
जोशी हे मुळचे सांगली जिल्ह्यातील चिंचणी ता.तासगाव या गावचे होते.१९५० मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. पुणे येथील सायंदैनिक लोकराज्य, दैनिक संध्या, दैनिक केसरी वर्तमानपत्रात उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, इंडियन फेडरेशन जर्नालिस्ट संघटनेचे कौन्सिल सदस्य म्हणून त्यांनी काम केले.यशवंतराव - इतिहासाचे एक पान, वेणूताई चव्हाण यांच्या जीवनावरील "ही ज्योत अनंताची" ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत असे समजते.
जेष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोंढापुरी ता.शिरूर येथील पत्रकार, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक विजय ढमढेरे यांनी सांगितले,मी सन १९८९ -१९९४ -२००० दरम्यानच्या काळात सायंदैनिक संध्या या वर्तमानपत्रात कोंढापुरी परिसरातील वार्ताहर म्हणून काम केले. तसेच दैनिक केसरी मधील वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात वेगवेगळ्या विषयांवर पत्रलेखन केले.
सायं दैनिक संध्या या वर्तमानपत्राचा माजी वार्ताहर, दैनिक केसरीचा माजी पत्रलेखक तसेच राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका माजी संचालक या नात्याने जेष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.