जेष्ठ समाजसेवक डाॅ.बाबा आढाव यांचे निधन
शिरूर:- कामगार,कष्टकरी,वंचित घटकांसाठी आयुष्यभर काम करणारे ,जेष्ठ समाजसेवक डाॅ.बाबा आढाव यांचे पुण्यातील पुना हाॅस्पिटलमध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पुना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत असल्याने त्यांच्यावर पुण्यातील पुना हाॅस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दैनिक प्रभात पुणे आवृत्तीने त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयात जावून त्यांची भेट घेतली होती. बाबासाहेब पांडुरंग आढाव असे त्यांचे पूर्ण नाव होते.जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून डाॅ.बाबा आढाव यांची ओळख महाराष्ट्रातील जनतेला असून पुण्यातील नाना पेठेत त्यांचे वास्तव्य होते. कष्टक-यांचे नेते म्हणून त्यांची ओळख असून समता,स्त्रीवाद,जातीय निर्मूलनावर त्यांनी काम केले आहे. रिक्षाचालक,हमाल माथाडी कामगार यांच्यासाठी त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली.एक गाव एक पाणवठा मोहिमेचे ते जनक असून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले.कष्टक-यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांना ओळखले जात असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन कामगार संघटना,वंचितांच्या हक्कासाठी घालविले .अस्पृश्यता,जातीय भेदभाव यांच्या विरुद्ध आयुष्यभर लढणारे बाबा आढाव हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते.रिक्षा,टॅक्सी चालकांसाठी त्यांनी अनेक उपोषणे,आंदोलने केली.