आई वडिलांची सेवा सर्वात श्रेष्ठ; ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के
शिक्रापूर :- आई वडिलांची सेवा सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन आळंदी येथील प्रवचनकार ह.भ.प.बालाजीमहाराज म्हस्के यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील माजी सरपंच बापुराव धोंडीबा गायकवाड यांच्या दशक्रिया विधी निमित्त त्यांचे चिरंजीव उद्योजक रामदास बापुराव गायकवाड माजी उपसरपंच,सोसायटीचे विद्यमान चेअरमन प्रकाश बापूराव गायकवाड परिवाराने आयोजित केलेल्या प्रवचनात ह.भ.प.बालाजीमहाराज म्हस्के बोलत होते. दशक्रिया विधीस राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, उद्योग,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी,कोंढापुरी,खंडाळे,निमगाव म्हाळुंगी,शिक्रापूर, गणेगाव खालसा,रांजणगाव गणपती,कासारी,तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांसह गायकवाड परिवाराचे पाहुणे, महिला मोठ्या संख्येने दशक्रिया विधीस उपस्थित होते. प्रवचनात पुढे बोलताना प्रवचनकार बालाजी महाराज म्हस्के म्हणाले,देव आहे म्हणून सृष्टी चालते.देवावर विश्वास ठेवा.देव आपल्या अंतःकरणात आहे म्हणून आपण चालतो,बोलतो.देव आहे पण दिसत नाही.झोपता -झोपता देवाचे नाव घेवून झोपा.उठल्या -उठल्या देवाचे नाव घ्या.दिवस चांगला जाईल.जन्माचे कल्याण होईल. आपल्याला देव भेटला तरी ओळखता येत नाही.नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला.एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला.आपल्याला माणसात देव दिसत नाही.देवापेक्षाही श्रेष्ठ कोण असेल तर आई -वडील श्रेष्ठ आहेत.फक्त आई वडिलांची सेवा करा.देवाचे भजन करण्यासाठी आपल्याला नियम दिले आहेत.
आपल्या हातातला कारभार निघून गेल्यावर आपल्याला कवडीमोल किंमत येते तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते.देवाला सुकलेली फुलं आवडतील का ? देवाला ताजी फुलं आवडतील? असा सवाल म्हस्के महाराज यांनी उपस्थित श्रोत्यांना केला. देव कृपाळू आहे,देव उदार आहे,देव दयाळू आहे असे सांगून ह.भ.प.प्रवचनकार बालाजी महाराज म्हस्के प्रवचनात म्हणाले,८४ लाख योनी भोगून माणसाचा जन्म आहे.माणसाच्या जन्माला येताना असंख्य दु:ख आहेत.आपण प्रवचन,कीर्तनात बसलो तर आपल्याला तासभर मांडी घालून बसता येत नाही.देवाचे नाव घेण्यासाठी कुठं जावं लागतं नाही.कुठं जायची गरज नाही.कुठल्याही रस्त्यावर देवाचे नाव घ्या, कुठल्याही वेळेला देवाचे नाव घ्या, कुठल्याही अवस्थेत देवाचे नाव घ्या.कल्याणचं होणार आहे.आई वडील श्रेष्ठ आहेत.संतांनी स्वतः कष्ट करून घेतले आहेत.लोकांची नावे ठेवून घेतली आहेत पण आपले कल्याण करण्यासाठी परोपकार आपल्यावर केले आहेत असे ह.भ.प.प्रवचनकार बालाजी महाराज म्हस्के यांनी प्रवचनात सांगितले. खंडाळे गावचे चेअरमन विठ्ठल कोंडीबा नरवडे यांनी यावेळी माजी सरपंच कै.बापूराव धोंडीबा गायकवाड यांना भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,सरपंच परिषदेचे भोर तालुकाध्यक्ष विजयराव गरूड, शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी मोबाईल मेसेज द्वारे श्रद्धांजली पाठवून गायकवाड परिवाराचे सांत्वन केले. कोंढापुरी गावचे ग्रामस्थ सुखदेवराव गोगावले यांच्या हस्ते प्रवचनकार ह.भ.प.बालाजी महाराज म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजक रामदास बापूराव गायकवाड,माजी उपसरपंच,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश बापूराव गायकवाड परिवाराच्या वतीने बंद पाकीटातून गुरूकुल आश्रमासाठी यावेळी देणगी देण्यात आली.
सतिश फक्कडराव गायकवाड यांनी सुत्रसंचलन करून माजी सरपंच कै.बापुराव धोंडीबा गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पसायदानाने दशक्रिया विधी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.