शेतक-यांच्या शेतावर छापा घालून २७० किलो गांजाची हिरवी झाडे जप्त करण्याची कारवाई अकोले तालुक्यातील राजूर पोलीसांनी केली.
याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आलेली असून मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील वारंघुशी गावातील कळम देवीवाडी येथील डोंगरदरीत मनोहर माधव घाणे, गोपाळा नामदेव लोटे, धोंडीराम चिंधू घाणे, चंदर देवराम लोटे या शेतक-यांनी गांजाची शेती केल्याची माहिती राजूर पोलीसांना मिळाली.
घटनास्थळी वाहनाने जाणे शक्य नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पोलीस पथकाने ३ किलोमीटर डोंगरदरीत पायी जात कारवाई सुरू केली. यावेळी शेतात इतर पिकांबरोबर गांजाची झाडे आढळून आली.
गुरूवारी उशीर झाल्याने ,अंधार पडल्याने या पथकाने ४ किलो ६०० ग्रॅम झाडे तोडून ताब्यात घेतली. शुक्रवारी सकाळी या पथकाने पुन्हा घटनास्थळी जावून उर्वरित कारवाई केली. या कारवाईत एकूण २ लाख ७० हजार रूपये किंमतीची २७० किलो गांजाची हिरवीगार झाडे ताब्यात घेतली.