शिरूर शहरातून जाणारा प्र जि मा 92 चे निकृष्ट कामाची सुधारणा करावी ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
शिरूर शहरातून जाणारा प्र जि मा 92 किलोमीटर 2/100 ते 2/600 चे निकृष्ट कामाची सुधारणा करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, जनहित कक्ष अध्यक्ष रवि बाळशिराम लेंडे, शिरूर शहर महाराष्ट्र सैनिक बंडू वसंत दुधाणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये प्रजिमा ९२ च्या रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम चालू आहे.
शिरूर शहरातील प्रजिमा ९२ हा पाबळफाटा ते जोशीवाडीपर्यंत डांबरी रस्ता आहे. परंतू आपल्या कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या रस्त्याच्या सुधारणा आदेशामध्ये सदर रस्त्याचे काम पाच भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामधील भाग दोनमधील म्हणजेच प्रजिमा ९२ किलोमीटर २/१०० ते २/६०० या अंतरामध्ये डांबरी रस्त्याचे काम न होता त्याठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. शिरूर शहर विकास आराखड्यानूसार सदरचा रस्ता ३० मीटर रूंदीचा आहे. परंतू आपल्या कार्यालयातून बनविण्यात आलेल्या अंदाजपत्रकानूसार रस्त्याचे काम काही ठिकाणी १५ .२ , १६ .२, १८ .२ तर काही ठिकाणी १४ .० या रूंदीमध्ये करण्यात येणार आहे हे अजबच आहे. संपुर्ण रस्ता एक असताना त्याचे वेगवेगळ्या प्रकारात,वेगवेगळ्या रूंदीमध्ये काम करणे आश्चर्यकारकच आहे.
एस टी स्टँन्ड ते पोस्ट ऑफिस पर्यंत सिमेंट रोड व उर्वरित भागामध्ये डांबरी रोड हे न उलगडणारे कोडे आहे. ज्या भागामध्ये सिमेंट रोड बनविण्यात येत आहे त्या भागात माणसे राहातात तर उर्वरित भागात जनावरे राहातात का ?
असा शोध आपल्या कार्यालयाने लावलेला दिसतो. शहरामध्ये उच्च जातीचे लोक उर्वरित भागात कमी जातीचे लोक राहातात .शहराचा विकास होत असताना तो सर्वत्र सारखाच पाहिजे. या सर्व गोष्टी विचार करायला लावणा-या आहेत.
शहरात बनविण्यात येणा-या रोड सुधारणा कामांचे फक्त उद्घाटनांचे बोर्ड लागले परंतू नागरिकांच्या माहितीचा बोर्ड अद्यापपर्यंत दर्शनी भागात कोठेही दिसला नाही. कामाचा आदेश, कोण ठेकेदार, कालमर्यादा , कोणता निधी याची कोणतीही माहिती शिरूरकरांना निदर्शनास येत नाही. नव्याने केलेल्या सिमेंट रोडवर अनेक त्रुटी आहेत सरळ असणारा रस्ताही कधी कधी वक्र झालेला दिसतो. रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आलेला माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांचा पुतळा काढून कोठे ठेवण्यात आला आहे याची पुसटशी कल्पना शिरूरकरांना नाही. पुतळा पुनर्वसन न करता तो काढणे ही गंभीर बाब आहे सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. आपण गांभीर्याने दखल घेवून रस्त्याची फेरदुरूस्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.