शिवसेनेचा दसरा मेळावा राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल
शिवसेनेचा दसरा मेळावा आज विजयादशमीच्या मुहूर्तावर होणार आहे. सायंकाळी सात वाजता माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे, तसेच शिवसेना प्रमुखांच्या भाषणाने राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये यादृष्टीने राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे. त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकूण क्षमतेच्या 50 टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.
राज्यात 22 ऑक्टोबरपासून बहुतांश निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली.
त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बराच खल झाल्याचे समजते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे.