शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या
Raju Tapal
March 01, 2023
100
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या
ठाणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गढ असलेल्या ठाण्यातच शिवसेनेच्या एका पदाधिकार्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. रवी परदेशी असे शिवसेनेच्या पदाधीकार्याचे नाव असून त्यांच्या कडे उपविभागप्रमुख ही जबादारी होती. रविवारी रात्री जांभळी नाका येथे धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभळीनाका या बाजारपेठेत शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांचा व्यवसाय होता. काही दिवसांपासून त्यांचे दुकानाच्या कारणावरून दोन फेरीवाल्यांसोबत वाद झाले होते. रविवारी रात्री १० वाजता परदेशी हे रात्री घरी जात असताना दोन ते तीन जणांनी त्याच्यांवर धारदार चाकूने हल्ला केला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ठाण्यात फेरीवाल्यांच्या वादातून यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. या हत्येनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Share This