शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एस टी जळून खाक
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशैने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना रविवारी दि.24ऑक्टोबरला रात्री सव्वादहाच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजिक घडली.
या घटनेत एस टी बस पूर्णपणे जळुन खाक झाली. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली एम एच 09 एफ एल 09983 या क्रमांकाची शयनयान एस टी बस रविवारी रात्री सव्वानऊ च्या सुमारास सातारा मध्यवर्ती बसस्थानकात आल्यानंतर काही वेळ थांबा घेवून ही बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजिक आली असता एस टी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने एस टी बस महामार्गाच्या कडेला लावली. सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. प्रवाशी खाली सुरक्षित उतरल्यानंतर काही क्षणात एस टी बसने पेट घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले यामध्ये संपूर्ण एस टी बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठविण्यात आले.