श्री क्षेत्र आळंदीत कार्तिकी एकादशी हरिनामात साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी श्री क्षेत्र आळंदी येथे लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी झाली.
जवळपास २ वर्षांपासून माऊलींच्या दर्शनासाठी आस लावून बसलेल्या वारक-यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीसोहळा आणि कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविकांनी हजेरी लावली.
इंद्रायणी घाटावर वैष्णवांनी फुगडीचा फेरही धरला. टाळ मृदंगाच्या गजरात काहींनी देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.
कार्तिक यात्रेच्या पहाट पुजेस प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड विकास ढगे, पुणे जिल्हाधिकारी डी.राजेंद्र देशमुख, प्रांत विक्रांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुष्पाताई कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, नगरसेवक सचिन गिलबिले, नगरसेविका प्रतिमा गोगावले, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,मानकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.
पहाटे घंटानाद झाल्यानंतर दोनच्या सुमारास पवमान अभिषेक, व ११ ब्रम्हंद़ाच्या उपस्थितीत वेदमंत्र जयघोष प्रसाद जोशी यांच्या पौराहित्याने झाला.
परंपरेने भीमा वाघमारे यांच्या सनई चौघड्याच्या मंजूळ स्वराने भक्तिमय वातावरण निर्मिती केली.
मंदिरात पहाट पुजेला आकर्षक फुलांची सजावट मानसिंग पाचूंदकर यांच्या वतीने करण्यात आली.
आकर्षक विद्यूतरोषणाई, रंगावली रेखाटण्यात आली होती.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पुजा ११ ब्रम्हनंदांच्या वेदमंत्र जयघोषात पुजा करण्यात आली.
दुपारी फराळाचा महानैवेद्य झाला. पालखी नगरप्रदक्षिणेस दुपारी महाद्वारातून बाहेर निघाली.
मारूती मंदिरात आरती, अभंग, हरिनाम गजर व प्रमुख मानक-यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्रींचा रथोत्सव बुधवारी दि.१ डिसेंबरला गोपाळपुरातून निघणार आहे.