केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२१ या अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत शिरूर नगरपरिषदेने १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटातून संपूर्ण देशात ९ वा तर पश्चिम भारतातील सहा राज्यातील ६०० नगरपरिषदांतून ५ वा क्रमांक पटकावला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान - २०२१ अंतर्गत कचरामुक्त शहर व थ्री स्टार मानांकन मिळाल्याबद्दल नवीन दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात गृहनिर्माण व नागरी मंत्रालयाचे सचिव दूर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते शिरूर नगरपरिषदेस गौरविण्यात आले.
नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैशालीताई वाखारे ,मुख्याधिकारी ऍड. प्रसाद बोरकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराबरोबरच उघड्यावरील हागणदारी मुक्तीबाबतचे विशेष मानांकनही नगरपरिषदेला मिळाले आहे.
स्वच्छ भारत अभियान शहरात राबविण्याकरिता तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्याबरोबरच नगरपरिषदेमार्फत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पावर १०० टक्के कचरा प्रक्रिया करण्याचे नियोजन केले. यामध्ये शहरात दैनंदिन निर्माण होणा-या घनकच-याचे ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, ओल्या कच-याचे कंपोस्ट खत तयार करणे ,सुका कचरा पुनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठविणे अशा प्रकारची कामे नियोजनपूर्वक केली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी होण्यासाठी नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाशशेठ धारिवाल, नगराध्यक्षा वैशालीताई वाखारे, तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरपरिषदेच्या स्चच्छता समितीचे सभापती विठ्ठल पवार, स्वच्छता निरीक्षक डी टी बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी ,सफाई कामगारांनी विशेष योगदान दिले.
प्रकाशशेठ धारिवाल यांच्या कुशल नेतृत्वाखाली ,आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबविल्यानेच हा पुरस्कार प्राप्त होवू शकला असे नगरसेवक विजय दुगड यांनी पत्रकारांना सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील यशासाठी नगरपरिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले असले तरी या यशाचे खरे शिल्पकार शिरूरकर नागरिक आहेत. हे अभियान सुरू झाल्यापासून नागरिकांनी शिस्तपद्धतीने सहयोग दिल्याने व नगरपरिषदेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळेच नगरपरिषदेला हा पुरस्कार प्राप्त झाला.सर्व शिरूरकरांचा हा सन्मान आहे असे शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैशालीताई वाखारे यांनी पत्रकारांना सांगितले.