बोगस पत्रकारांवर कारवाई करा पत्रकार राजाराम गायकवाड
शिरूर:-
बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी शिक्रापूर ता .शिरूर येथील पत्रकार राजाराम गायकवाड यांनी केली आहे.
हवेली तालुक्यातील उरूळी कांचन येथील अवैध धंद्यावर एका व्यक्तीने पत्रकार असल्याचे भासवून दमदाटी करून ५००/- रूपयांचा हप्ता मागितल्याची बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
हप्ता मागणारा बोगस पत्रकार असल्याचे तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला ओळखपत्राची मागणी केल्यानंतर त्याने दोन बोगस ओळखपत्र दाखविले. नागरिकांनी त्याला तु कसला पत्रकार आहेस? तुला "ग "चा "म" कळतो का ? असे विचारल्यानंतर बोगस पत्रकाराने तेथून पळ काढला.
बोगस पत्रकार आढळल्यास त्याच्या गाडीवर press ची पाटी पोलीसांच्या निदर्शनास आल्यावर गाडीवर तसेच गाडी मालकावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करणार तसेच जर कोणी हप्ते मागत असतील तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे दौंड उपविभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी जाहीर केले आहे.
या बातमी बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील पत्रकार राजाराम शंकर गायकवाड यांनी म्हटले आहे, सध्या पत्रकारितेच्या नावाखाली चाललेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असलेल्या पत्रकारांचा बोगस पत्रकारांमुळे मोठा अपमान होत आहे. हल्ली पत्रकारितेच्या नावाखाली काही जण खंडणी उकळतात, गैरप्रकार करतात असे प्रकार सर्रास चालू आहेत. काही पत्रकारांनी २५ -२५ वर्षे पत्रकारिता प्रामाणिकपणे केली त्यांच्यावर अशा प्रकारांमुळे खूप मोठा अन्याय होत आहे. या प्रकाराला कुठे तरी आळा बसावा ही अपेक्षा.बोगस पत्रकारांची शहानिशा करून ओळखपत्र देणारा म्होरक्या शोधून त्यांच्यावर पोलीसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.ज्यांना बातम्या लिहिता येत नाहीत अशांना दोन -चार हजारांत ओळखपत्र देवून नामधारी पत्रकार बनविले जाते. अशा बोगस पत्रकारांमुळे अधिकृत पत्रकार बदनाम होत चालले आहेत. पोलीसांनी गाडी अडवू नये म्हणून पत्रकार नावाचा , press नावाचा दुरूपयोग बोगस पत्रकार करत आहेत. याबाबत दौंड उपविभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी जाहीर केलेली भूमिका अधिकृत पत्रकारांच्या दृष्टीने स्वागतार्ह असून पुणे जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिका-यांनी बोगस पत्रकारांवर कारवाई करावी अशी मागणी मी राजाराम शंकर गायकवाड पत्रकार म्हणून करत आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (शिरूर जि.पुणे)