तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष!
राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल
मुंबई:-महसूल विभागातील ग्रामस्तरावर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामात राज्य शासनाने बदल केला आहे. तलाठ्यांना यापुढे ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखण्यात येणार असून, कोतवालांना महसूल सेवक म्हणून संबोधण्यात येईल.शासकीय कार्यालयांमधील अव्वल कारकून यांचेही पदनाम बदलण्यात आले असून, त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीनंतर महसूल विभागाने पदनामातील बदलांचे तीन शासन निर्णय जारी केले. त्यानुसार तलाठी, कोतवाल व अव्वल कारकून यांच्या पदनामातील हे बदल सुचविले आहेत. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल ही प्रचलित नावे आहेत. सर्वांना परिचित असलेल्या या पदांच्या नामात बदल झाल्याने त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या माध्यमातून केला आहे.