अमेरिकेतील सर्वांत मोठ्या आरोग्य सेवा कंपनीच्या प्रमुखाची गोळ्या घालून हत्या
Raju tapal
December 05, 2024
22
अमेरिकेतील सर्वांत मोठ्या आरोग्य सेवा कंपनीच्या प्रमुखाची गोळ्या घालून हत्या
अमेरिकेत युनायटेड हेल्थकेअरचे सीईओ ब्रायन थॉम्पसन यांची भर रस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मॅनहॅटनमधील हिल्टन हॉटेलच्या बाहेर मास्क परिधान केलेल्या एका मारेकऱ्यानं त्यांची हत्या केली आहे.
ब्रायन (वय 50 वर्षे) यांच्या छातीत गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याठिकाणी तपासल्यानंतर डॉक्टरांनी थॉम्पसन यांना मृत घोषित केलं. थॉम्पसन याठिकाणी कंपनीच्या इनव्हेस्टर डे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला.
मारेकरी थॉम्पसन यांनी वाट पाहत हॉटेलच्या बाहेर थांबलेला होता. थॉम्पसन रस्त्यावरून जात असताना मारेकऱ्याने मागच्या बाजूने त्यांच्यावर गोळी झाडली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 06.45 मिनिटांनी त्यांच्यावर हा हल्ला झाला.
पोलीस अजूनही मारेकऱ्याच्या शोधात असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या पाळत ठेवून आणि लक्ष्य करून करण्यात आली आहे. ब्रायन यांच्या छातीसह त्यांच्या पायात गोळी लागली होती, अशी माहितीही पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.हल्ल्यानंतर मारेकरी लगेचच इलेक्ट्रिक बाइकद्वारे पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यासाठी 10 हजार डॉलरचं बक्षीसही जाहीर केलं आहे.
हल्ल्यापूर्वी ब्रायन यांना काही धमकी देण्यात आली होती का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्यामुळंही सर्वांना प्रचंड धक्का बसला आहे. हिल्टन हॉटेल हे मिडटाऊनमध्ये असून टाइम्स स्क्वेअर, रॉकफेलर सेंटर आणि म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट या ठिकाणांपासून थोड्याच अंतरावर आहे. या सगळ्या ठिकाणी पर्यटकांची कायम वर्दळ असते.
तसंच हिल्टन हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणावर पर्यटक राहत असतात. अनेक कॉन्फरन्स किंवा विविध कंपन्यांचे इव्हेंटही अनेकदा इथं आयोजिक केले जातात. त्यामुळं या घटनेनंतर प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
युनायटेड हेल्थकेअर ही कंपनी मिनसोटा राज्यातून चालते. याठिकाणचे गव्हर्नर आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार टीम वॉल्ट्ज यांनी थॉम्पसन यांची हत्या भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे
प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिले?
या घटनेबाबत माहिती देताना प्रत्यक्षदर्शींनी जॉन सुडवर्थ यांना सांगितलं की, मारेकऱ्यानं काळी हुडी परिधान केलेली होती. तसंच त्याच्या पाठिवर एक बॅगही होती.
हा मारेकरी जणू हॉटेलच्या बाहेर त्यांची वाट पाहत थांबलेला होता, असंही त्यांनी सांगितलं.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यानं ब्रायन यांच्यावर काही गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर लगेचच तो त्याठिकाणाहून सायकलवरून पळून गेला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेले मारेकऱ्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोस्ट केले आहेत.
हा हल्ला झाल्यानंतर काही क्षणांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, अशी माहितीही काही स्थानिकांनी दिली.
कोण होते ब्रायन थॉम्पसन?
ब्रायन थॉम्पसन हे अमेरिकेतील युनायटेड हेल्थकेअर या एका मोठ्या विमा कंपनीचे प्रमुख होते.
एप्रिल 2021 मध्ये थॉम्पसन यांच्यावर युनायटेड हेल्थकेअर कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्यावर्षी या कंपनीसोबत काम करताना थॉम्पसन यांनी 10.2 दशलक्ष डॉलरची कमाई केली होती.
ब्रायन यांनी 2004 मध्ये या कंपनीत कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक पदांवर काम केलं. त्यात अनेक मोठ्या पदांचाही समावेश होता. कंपनीच्या सरकारी योजनेच्या विभागाचे सीईओ म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
ब्रायन थॉम्पसन यांनी आयोवा विद्यापीठातून 1997 मध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली होती. त्यांच्या लिंक्ड इन प्रोफाईलवर याबाबत माहिती दिलेली आहे.
युनायटेड हेल्थकेअर काय आहे?
आर्थिक बाबतीत विचार करता युनायटेड हेल्थकेअर ही अमेरिकेतील सर्वात मोठी हेल्थ केअर कंपनी आहे. मिनसोटामधील मिनटोनका याठिकाणाहून या कंपनीचं काम चालतं.
युनायटेड हेल्थकेअरची पॅरेंट कंपनी युनायटेड हेल्थ ग्रुपची स्थापना 1970 मध्ये झाली होती. 2023 च्या आकडेवारीचा विचार करता या कंपनीचे एकूण निव्वळ उत्पन्न हे 22.3 अब्ज डॉलर एवढे होते.
युनायटेड हेल्थकेअर ही अमेरिकेत वैद्यकीय विमा सुविधा उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपन्यांसाठी वैद्यकीय विमा उपलब्ध करून देण्याचं कामही ही कंपनी करते. तसंच सरकारी वैद्यकीय विम्याची सुविधाही कंपनीकडे आहे.
या कंपनीत जगभरात जवळपास 4,40,000 कर्मचारी काम करतात.
या हल्ल्यानंतर युनायटेड हेल्थ कंपनीच्या वतीनं निवेदन जारी करण्यात आलं आहे. या घटनेनं प्रचंड धक्का बसला असून ब्रायन यांच्या निधनाचं प्रचंड दुःख असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.
Share This