• Total Visitor ( 435858 )
News photo

शिक्षक बदल्यांचा निर्णय अखेर जिल्हा पातळीवर!

Raju tapal November 06, 2025 66

शिक्षक बदल्यांचा निर्णय अखेर जिल्हा पातळीवर!



मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच सर्वाधिकार



अमरावती-ता.६: जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांच्या अधिकाराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून शिक्षक संघटनांसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरला होता. अखेर ग्रामविकास विभागाने ४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे या संदर्भात मोठा निर्णय घेत,शिक्षक बदल्या आता जिल्हा परिषद सीईओ यांच्या अखत्यारीतच राहतील,हे स्पष्ट केले आहे. राज्यभरातील शिक्षकांनी स्वागत केलेल्या या निर्णयामुळे जिल्हा पातळीवरील अधिकार पुनस्र्थापित होऊन बदल्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच बदल्यांचे अधिकार होते. मात्र, काही वर्षांपूर्वी बदल्यांची प्रक्रिया पूर्णतः राज्य स्तरावर केंद्रीकृत करण्यात आली होती. ग्रामविकास मंत्रालयाकडून थेट प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत होत्या. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची ठरल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली. विन्सिस आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे अनेक अडचणी आल्या; अर्ज सादरीकरण,प्राधान्यक्रम तपासणी आणि याद्या प्रसिद्धीमध्ये त्रुटी निर्माण झाल्या. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आणि अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. राज्य स्तरावरून होणाऱ्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव, तांत्रिक चुका आणि अन्यायकारक याद्यांमुळे ग्रामविकास विभागाला वारंवार प्रतिज्ञापत्र सादर करावे लागले. अखेर या सर्व घोळाची दखल घेत ग्रामविकास विभागाने शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेतील स्वतःचा हस्तक्षेप मागे घेतला आहे. आता विभागाचे काम केवळ धोरणात्मक मार्गदर्शनापुरते मर्यादित असेल. या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षासाठी म्हणजेच २०२५-२६ साठीची बदली प्रक्रिया ३१ मेपूर्वी पूर्ण होऊन १५ जूनपूर्वी शिक्षकांना त्यांच्या नवीन ठिकाणी रुजू होता येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बदल्यांमुळे शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांची स्थैर्यभावना दोन्ही जपले जातील,असा विश्वास शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.

कोट--'शिक्षक बदल्यांबाबत आलेल्या या नवीन शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे बदली प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण होईल. ३१ मेपूर्वी सर्व शिक्षकांची बदली होऊन शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १५ जून व विदर्भात २३जूनपूर्वी सर्व शिक्षक आपल्या नवीन ठिकाणी कार्यरत असतील. जुन्या पद्धतीमुळे शिक्षण प्रक्रिया, विद्यार्थी आणि शिक्षक तिघांच्याही कामकाजात गोंधळ निर्माण झाला होता. -राजेश सावरकर,राज्य प्रसिध्दी प्रमुख,प्राथमिक शिक्षक समिती

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement