राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी;डाॅ.नंदकिशोर उगले
शिक्रापूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांच्या ग्रामगीतेतील विचार आजही सातत्याने युवकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन ओतूर येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख नंदकिशोर उगले यांनी केले. तळेगांव ढमढेरे,येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज तळेगांव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत '' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज " या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना उगले बोलत होते. याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाची तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला महाविद्यालयात सुरू आहे. त्या व्याख्यानमालेचेही आज द्वितीय पुष्प राहुल जगदाळे यांनी गुंफले. महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे, शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेशबापू ढमढेरे,उपप्राचार्य प्रा.पराग चौधरी, व्याख्यानमालेचे समन्वयक दत्तात्रय वाबळे,बहिशाल शिक्षण मंडळाच्या केंद्र कार्यवाह संभाजी शिंदे आदि यावेळी उपस्थीत होते. साहेबरावअण्णा शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचे यंदाचे सातवे वर्ष आहे. उगले पुढे म्हणाले की,आजचा भारत विकसित होत असताना युवकांना निश्चित अशी दिशा देणे गरजेचे आहे. आजूबाजूच्या अस्वस्थ वातावरणात सुयोग्य आचरणाची बीजे तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे जीवनाचे सार्थक करायचे असेल तर राष्ट्रसंतांचे विचारच आपल्याला सदाचाराच्या मार्गावर घेऊन जात असल्याचे डॉ. उगले यांनी सांगितले. राहुल जगदाळे यांनीही यावेळी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून "अभिजात मराठी भाषा" या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. मराठी भाषा ही बोलीभाषा ज्ञानसंपन्न आणि समृद्ध असल्याचे ते म्हणाले. प्रभावी अभिव्यक्तीचे मातृभाषा हे प्रमुख साधन असल्याचे त्यांनी सांगितले. मराठीमध्ये व्यापक आणि विपुल अशी ग्रंथसंपदा असून युवकांनी सातत्याने वाचन करणे गरजेचे असल्याचे जगदाळे म्हणाले. विविध पंथ,संप्रदाय आणि समृद्ध अशी परंपरा असलेली आपली मराठी भाषा असून तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी निभावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी तरुणांनी सातत्याने सदविचारांचा आग्रह धरायला हवा असा आग्रह केला. आपल्या पालकांची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम करून जीवनाला आकार देणे गरजेचे असल्याचे मुसमाडे यांनी यावेळी सांगितले . थोर व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणेतूनच युवकांनी स्व- कर्तुत्व घडविण्यासाठी सदैव तत्पर असण्याचे आवाहनही त्यांनी केले.व्याख्यानमालेचे समन्वयक दत्तात्रय वाबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. बहि;शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह संभाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्रीती पवार यांनी आभाप्रदर्शन केले. मराठी विभागप्रमुख संदीप सांगळे,सोमनाथ पाटील,पद्माकर गोरे,मनोहर जमदाडे, अमेय काळे,सुमेध गजबे,विवेक खाबडे,रवींद्र भगत,प्रमोद पाटील,प्रीती पवार,विद्या टुले,कांचन गायकवाड,राहुल महाजन,अविनाश नवले,राम कराळे,अश्विनी पवार,आकाश मिसाळ,कल्याणी ढमढेरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.