गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाझर तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पाटसरा येथे घडली.
नीता कुंडलिक साबळे वय १५ असे तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
पाटसरा येथील नीता साबळे लहान भावासह गावापासून जवळच असलेल्या सुरूडी परिसरातील बुवासाहेब तलावाच्या जवळ गुरूवरी दुपारी गुरे चारण्यासाठी गेली होती. काही वेळाने ती दिसेनाशी झाली. त्यामुळे तिचा भाऊ एकटाच गुरे घरी घेवून गेला. नीता दिसली नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला. ती सापडली नाही. शुक्रवारी सकाळी तलाव परिसरात नातेवाईकांनी पाहणी केली त्यावेळी तलावात नीताघा मृतदेह आढळून आला.
आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहूल पतंगे, पोलीस नाईक संतोष दराडे, यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
आष्टी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली.