सीसीटीव्ही असतानाही कणकवली शहरात चोरट्यांनी फोडली तब्बल पाच दुकाने
कणकवली शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला
कणकवली पोलीसांकडे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान..
कणकवली :- शहरातील पाच दुकाने शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दुकानांची शटर तोडून आतील काही रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. यामध्ये दोन दुकानांमधील काही रोख रक्कम चोरीस गेली असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
कणकवली शहरातील आस्था बेकरी, राणे मेडिकल स्टोअर्स, तेलीआळी येथील म्हापसेकर मेडिकल शॉपी, कामत किराणा दुकान, विश्वकर्मा मोबाईल शॉपी व भगवती एंटरप्राईजेस अशी दुकाने चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानांचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. आस्था बेकरी व कामत किराणा दुकानातील काही रक्कम चोरट्यानी पळविल्याचे समजते. अन्य दुकानांमधून काही चोरीला गेले नसल्याच्या समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, मनोज गुरव यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.एकाच दिवशी बाजारपेठेतील पाच दुकाने चोरट्याने फोडली असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.