टिटवाळ्यात नालेसफाईची ऐशी कि तैशी...!
गटारातील गाळ रस्त्यावर,घाण,आणि कचऱ्याचे साम्राज्य
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीत ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच महापालिका प्रशासन नाले सफाईला सुरुवात करते. मात्र या कामाकडे प्रशासनाचा कुठलाच अधिकारी व्यवस्थित रित्या लक्ष देत नसल्याने या नालेसफाईच्या कामाचा बोजवारा उडत असून अर्धवट कामे काही ठिकाणी हॊत आहेत. तर काही ठिकाणी नाले सफाईचे कामे होतच नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच नालेसफाईचे केलेले काम तसेच नाले व गटारांमधील निघालेला गाळ,कचरा रस्त्यावरच टाकून दिलेला असल्याने पावसाच्या पाण्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते आता गाळाचे झालेले असल्याचे दिसून येत आहे.
टिटवाळा गणपती मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या काही नाल्याची साफसफाई करण्यात आली. मात्र नाल्यातून निघालेला गाळ,माती,कचरा,प्लास्टिक हे ठेकेदाराने काही केल्या उचलले नसल्याने सदरील गाळ हा पावसाच्या पाण्याने संपूर्ण रस्त्यावर आलेला आहे. तसेच नाल्यातून काढलेली घाण हि रस्त्यावरच टाकल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. अश्यातच नाल्यातून निघालेला कचरा,प्लास्टिक झाडे झुडपे हे हि रस्त्याला ढिगाऱ्यासारखे लावून ठेवलेले असल्याने शहर व रस्ते विद्रुपीकरण यामुळे होत आहे. गायत्री धाम संकुलाच्या विरुद्ध दिशेला ह्या गाळ युक्त कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात दिसून येत असून इथे या दुर्गंधी मुले रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत केडीएमसीचे नाले सफाईचे काम पाहणारे ज्युनिअर इंजिनिअर देवेंद्र एखंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माही नाहीत मात्र तुम्ही फोटो व ठिकाण सांगा तेथे काम करणाऱ्या ठेकेदाराला मी काम करण्यास सांगतो असे एखंडे यांनी सांगितले.
टिटवाळा गणपती मंदिर परिसरातही काही ठिकाणचे नाले सकाफ करण्यात आलेले असून काही नाल्यांमधून आताच पाणी रस्त्यावर येत आहे. काही मोजक्याच ठिकाणांची साफसफाई केली जात असल्याने या नालेसफाई कडे मुद्दाहून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
दरम्यान सिमेंट काँक्रीट च्या रस्त्यावर बरीच ठिकाणी गाळ आल्याने या गालावरून जाणाऱ्या दुचाकींच्या अपघातातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून याकडे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.