टिटवाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबातुंबी
Raju Tapal
September 17, 2022
48
टिटवाळ्यात पावसाच्या पाण्याने तुंबातुंबी
बारवी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडले
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस व त्यातही आज दिवसभर सुरु असलेली पावसाची संततधार यामुळे टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याचे दृश्य दिसून येत होते. तर काही ठिकाणी पावसाचे पाणीही हि नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे हि मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने रुंदा नदीवरील पुल दुपारीच पाण्याखाली गेला होता. डीजी वन समोरील नाल्याच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर निमकर नाक्यावरील स्वामी विवेकानंद चौक,मधुबन सोसोयटीच्या समोरील रायभोळे निवास परिसर,इंदिरा नगर येथील चाळींचा परिसर,उंभरणी,बल्याणी परिसरातील शेती,नारायण नगरचा परिसर,मांडा पश्चिम स्टेशन जवळील परिसर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलर होते तर बारवी धरणाची पाणी ७२. ७२ पातळी एवढी होऊन ७२.६० धरण ओव्हर फ्लो पातळी ओलांडून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेतअशी माहिती बारवी धरणाचे उप अभियंता संजय माने यांनी सांगितले. तर पिसे धरणातही पाण्याची आवक खूपच मोठ्या प्रमाणात सुरु झालेली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रातील अनेक नद्या नाले तुडुंब भरलेले असून ठाणे पाटबंधारे विभागाने नदी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने खडवली येथील भातसा नदी दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भागातील चाळींमध्ये देखील पाणी शिरलेले आहे. रुंदा काळू येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तिथूनही वाहतूक बंद करण्यात आली होती. रायते येथील उल्हास नदीही दुथडी भरून वाहत असल्याने तसेच पुलाला पाणी जवळजवळ खेटतच आलेले आहे.
गुरवली पुलाच्या खालून देखील काळू नदीही दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील चाळींमध्ये पाणी शिरले होते. तर जवळच असलेल्या जल शुद्धीकरण केंद्रावरून पाण्याचे पंप वर घेण्यात आले होते. त्यामुळे काळू नदीवरील उद्यनचन केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. टिटवाळा गणपती मंदिर रोड वरील डिजी वनव पटेल मार्ट समोरील संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेल्याने घर आंगण नारायण नगर परिसरातील संपूर्ण रस्ते व चाळींच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. मोहने वरून बल्याणी कडे येणाऱ्या रस्त्यावरील मोहिली गावाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे तिथूनही मोहिली,घोटसई, नांदप,बल्याणी,मानिवली कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात ही पावसाच्या पुराचे पाणी गेल्याने तिथून ही पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे समजते. मांडा पश्चिमेतील वासुंद्री नदीवरील पुलाला पाणी लागल्याने परिसरातील अनेक चाळींमध्ये पावसाचे गेले आहेत. एकंदरीतच संपूर्ण कल्याण ग्रामीण भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने असंख्य नागरिकांचे जनजीवन तसेच वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. दरम्यान अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
Share This