टिटवाळ्यात "साडे तीन शक्तीपीठांच्या" दर्शनासाठी भाविकांची रिघ
रत्नाकर पाटील यांनी भरवलाय देवींचा दरबार
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळ्यातील रत्नाकर धर्मा पाटील यांनी आपल्या निमकर नाक्याजवळील मंगलमूर्ती या निवासस्थानी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान केला असून यंदाच्या त्यांच्या घरघुती गणेशोत्सवाचे हे 24 वे वर्ष आहे. यंदाच्या गणपती आरासीत त्यांनी देवींची साडेतीन शक्तीपीठे ची आरास भाविकांसाठी देखावा म्हणून साकारला आहे. त्यांची प्रत्येक वर्षी एकच प्रकारची सव्वा दोन फुटांची मनमोहक मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. सदरील देवीच्या साडे तीन शक्तीपीठांमध्ये कालिकामता,महालक्ष्मी,तुळजा भवानी,सप्तश्रृंगी, काळूबाई,जीवदानी माता,आई एकविरा,माता वैष्णोदेवी देवींची आरास मनमोहक बघावयास मिळत आहे. देवींची वाहने,आयुधे हे ही तिथे दर्शविण्यात आलेले आहे. तर कमळामध्ये देवी सरस्वती बसलेली असल्याचा देखावा भन्नाट केला आहे. त्यातच अष्टविनायक,शंकर भगवान यांचे मनमोहक रूप बघावयास मिळते. तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या या आराशींचे काम दहा ते बारा जण अगदी मेहनतीने करताना दिसतात. कमळात बसलेल्या सरस्वती माते समोर 108 दिव्यांची दिपमाळ खरंच बघण्यासारखी आहे. मांडा पश्चिमेतील धर्मा निवास येथून सुरू झालेली परंपरा आता निमकर नाक्याजवळील मंगलमूर्ती निवास येथे रत्नाकर पाटील हे आपली पत्नी सारिका,मुले आदिल, आयुष यांच्या साथीने गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत आहेत.
येत्या बुधवारी 27 सप्टेंबर रोजी रत्नाकर पाटील यांनी सत्यनारायण महापूजा व भंडारा चे आयोजन केले असून सर्व गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहनही रत्नाकर पाटील यांनी केले आहे.