टिटवाळ्यातील पटेल मार्ट मॉल मधून घेतलेल्या पिठात चक्क आढळलं प्लास्टिक
टिटवाळा गणेश मंदिर रोडवर असलेल्या प्रख्यात पटेल मार्ट या मॉल मध्ये खरेदी केलेल्या गव्हाच्या पिठात मळल्या नंतर चक्क प्लास्टिक आढळल्याने ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पटेल मार्ट मधील सर्व जिवनाश्यक खाद्य पदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या अगोदरही अनेकदा बऱ्याच ग्राहकांना निकृष्ठ दर्जाचे खाद्य पदार्थ मिळत असल्याच्या तक्रारी खुद्द ग्राहकांनीच केल्या होत्या. यावर ठाण्याच्या खाद्य पदार्थ विभागाने पटेल मार्टला नोटीस बजावून निकृष्ट खाद्य पदार्थांबद्दल खडे बोल सुनावले होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,आजही सर्वसामान्य नागरिक धावपळीच्या जीवनात वेळेअभावी सर्व घरघुती सामान एकठिकाणी मिळणाऱ्या मॉल मध्ये धाव घेऊन खरेदी करतात. मॉल मध्येही जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे डिस्काउंट,कुपन्स,फ्री गिफ्ट,घरपोच सामान देऊन त्यांचे आकर्षण वाढवीत असतात. मात्र या आमिषाला बळी पडणाऱ्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ मारले जात आहे असाच प्रकार टिटवाळ्यातील उमिया कॉम्प्लेक्स येथे राहणारे बाळा तारमळे यांच्या भोवती घडलेला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून बाळा तारमळे हे गणपती मंदिर रोडवरील पटेल मार्ट येथून घरासाठी लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तू खरेदी करतात. त्यांनी आताही गेल्या 13 ऑक्टोबर रोजी काही घरघुती सामान खरेदी केल. नेहमी प्रमाणे त्यांनी घेतलेल्या पटेल फ्रेश चक्की फ्रेश आटा घेतला होता. मात्र त्यांच्या घरच्यांनी पिठ मळण्यास घेतले असता त्या पिठाला मळल्या नंतर त्यातून प्लास्टिक सारखा पदार्थ निघू लागला असता त्यांनी याबाबतचा व्हिडीओ काढला. सदरील दुकानातून घेतलेल्या सामानाची बिल,व्हिडीओ त्यांनी पत्रकार राजू टपाल यांच्याकडे देऊन नागरिकांची होणारी फसवणूक थांबावी अशी मागणी केली. त्यामुळे पटेल मार्ट मधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपण खरेदी केलेले सामान यापुढे तपासून घ्यावे लागणार आहे. या अगोदरही इंदिरानगर येथील ग्राहक रवी वानखडे यांनी खरेदी केलेल्या काजू मध्ये आळ्या सापडल्या होत्या तर अमूल छास मध्येही आळ्या निघाल्या होत्या. त्यावेळी पटेल मार्ट च्या व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली होती.
टिटवाळ्यातील पटेल मार्ट हे मोठी जाहिरातबाजी करून नागरिकांची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ नागरिकांच्या माथी मारून त्यांच्या जिविताशी खेळत असते. नेहमीच इथे कुठल्या ना कुठल्या तरी सामना हे निकृष्ट दर्जाचे आढळते. त्यामुळे या पटेल मार्ट वर खऱ्या अर्थाने कारवाईचा बडगा उगारणार कधी...? अन्न व औषध प्रशासन विभाग या गोष्टींकडे लक्ष कधी देईल. ग्राहकांना झालेल्या मनस्तापाच्या बदल्यात वाढीव वस्तू देऊन आपला खराब माल ग्राहकांच्या किती दिवस माथी मारणार आहेत. या पटेल मार्टवर कायदेशीर कारवाई केव्हा होईल ? नागरिकांच्या जिविताशी खेळणाऱ्या मॉल मधील निकृष्ट दर्जाचे सामान घेण्यासाठी ग्राहक केव्हा पाठ फिरवतील. सदरील मॉलच्या निकृष्ट दर्जाच्या अन्न धान्य व इतर जीवनापयोगी वस्तूंच्या विरोधात नागरिक जागृत केव्हा होतील हा मोठा गहन प्रश्न आहे.