• Total Visitor ( 133867 )

साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर

Raju tapal February 03, 2025 80

शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद!
साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, 
एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर

अहिल्यानगर :- साईंची शिर्डी हत्याकांडानं हादरली आहे. शिर्डी संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली. तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे.

पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत. यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष घोडे हे मंदिरातील साईमंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला.

मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर राजू माळी हा दुसरा आरोपी आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विविध पथक तैनात करुन शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी अपघात म्हटल्यानं नातेवाईकांमध्ये संताप

पोलिसांनी अपघात असल्याचं सांगून घटना गांभीर्यानं न घेतल्यानं मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत अटक होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे. सकाळ घटनास्थळी आलेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या घटना अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं सांगितलं. पहाटे साडेपाच वाजता घटनांची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी मृतदेह रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली.

पोलीस कर्मचाऱ्यासह पोलीस निरीक्षकावर कारवाई होईल

माजी खासदार सुजय विखेपाटील म्हणाले, "पोलिसांना अपघात आणि खून यातील फरक कळत नाही, त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील."

योग्य उपाययोजना करण्याची मागणी:-

साईबाबा रुग्णालयात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देवून मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. शिर्डीचे ताराचंद कोते, सचिन चौघुले , शिवाजी गोंदकर , अनिता जगताप , विजय जगताप , कैलास कोते आदींनी रुग्णालयात येवून नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कारवाईसह योग्य उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.
 

Share This

titwala-news

Advertisement