वाघदगड-आंबेमाळीच्या आदिवासी बांधवांना विकासाच्या नावावर भ्रमाचा भोपळा...!
Raju Tapal
November 30, 2021
63
वाघदगड-आंबेमाळीच्या आदिवासी बांधवांना विकासाच्या नावावर भ्रमाचा भोपळा...!
मुलभूत सुविधांची वानवा,राज्यकर्त्यांची 'सवतीची' भूमिका..!
मुरबाड तालुक्याच्या फक्त नकाशावर तग धरून असणाऱ्या शंभर टक्के आदिवासी बांधव राहत असणाऱ्या वाघदगड-आंबेमाळी या गावाची साधी ओळख मुरबाड मधील कोणालाच माहीत नसावे हे मोठे दुर्दैव मुरबाडकरांचे म्हणावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वी आपण पुढच्या काळात साजरी करीत असतांना आदिवासी बांधव आजमितीला आपल्या मूलभूत सोई-सुविधां पासून कशा प्रकारे वंचीत राहतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वाघदगड-आंबेमाळी ही आदिवासी वस्ती...!
मुरबाड-माळशेजघाट या राष्ट्रीय महामार्ग घाट रस्त्या वरील टोकावडे या गावापासून सुमारे २५ किलोमीटर पुढे चिंचवाडी व निरगुडकरफाटा यांच्या दरम्यान या वाघदगड-आंबेमाळी गावाकडे मुख्य रस्त्याच्या बाजूने उजवीकडे एक दगड गोट्यांच्या 'राजमार्ग' जातो. खऱ्या अर्थाने सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना पायात गोळे आणणाऱ्या या राजमार्गाची सफर येथील आदिवासी बांधवांनी उन्हाळ्यात व पावसाळ्यात केली तर क्षणार्धात या रस्त्याचा पेच कायमचा सुटू शकतोय. दगड -धोंड्याची चिंचोळी एक माणूस जाईल अशी चढावाची बिकट वाट, प्रचंड चढ-उतार करीत या वाडीतील शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध आदिवासी बांधव,महिला टोकावड्याच्या बाजारातील आपले जीवन जगण्यासाठी लागणारी साधन सामुग्री ३ किलोमीटर पायपीट व २ तासांची दमछाक करीत डोंगर चढत आपला नित्यक्रम करीत आहेत ती पण कोणत्याही प्रकारची तक्रार न करता..!
मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत फांगुळगव्हाण अंतर्गत येणाऱ्या भैरवगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाघदगड-आंबेमाळी आदिवासी वस्तीत १५ घरे असून आदिवासी महादेव कोळी, ठाकर समाजाची सुमारे ८५ लोकसंख्या आहे. मात्र स्थानीक प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षीत धोरणा मुळे या आदिवासी वाडीचा सर्वांगीण विकास पुरता खुंटला आहे. परिणामी आदिवासी बांधव आपल्या मूलभूत सोई-सुविधां पासून आज घडीला कोसो दूरच राहिला आहे.डोळ्यावर झापडं घेतलेल्या राजकारण्यांना या 'अदृश्य' दुर्लक्षित आदिवासी वाडीचा खरंच विसर पडलाय त्यांना येथील आदिवासीचे काहीही देणं-घेणं नाही, मात्र निवडणुका आल्या की अचानक प्रकट होतात असे ग्रामस्थ सांगतात.
आपण ज्या ग्रामपंचायतीत राहतो त्या फांगुलगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच तथा ग्रामसेवक यांनी कधीच या वाडीच्या सोई-सुविधां कडे लक्ष दिले नाही. त्याच प्रमाणे आदिवासी समाजाचेच असणारे झेडपी व पंचायत समिती मेंबर यांनीही या आदिवासी गावाची व्यथा समजून घेतली नाही. पिण्याचे पाणी,रस्ता नाही.गरोदर महिला किंवा, आजारी माणसांना चादरीची डोली करून डोंगर पायवाटेने मुख्य रस्त्या पर्यन्त आणावे लागते. निवडणुका पुरता आमचा वापर करून घेतला जात असल्याची तिखट प्रतिक्रिया येथील रहिवासी दत्तू जानू खाकर यांनी या वेळी व्यक्त केली.
अरुंद-चिंचोळ्या दगड धोंड्याच्या रस्त्या वरून डोंगर चढत प्रवास करावा लागतो.त्या मुळे आमचा वेळ मोठया प्रमाणात या प्रवासात जातो त्या मुळे आमचा आभ्यास बुडतो, रस्ता लवकर व्हावा असे मोरोशी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या सागर साबळे या विद्यार्थ्यांने सांगितले.
या आदिवासी वस्तीत अद्याप पिण्यासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. येथील डबक्यातील साठवलेल्या अशुद्ध व माती मिश्रित पाणी पिऊन नागरिकांना जीवन जगावे लागत आहे.तेथील पाणी आटले की, पिण्याच्या पाण्याची एक प्लॅस्टिक टाकी डोंगराखाली ठेवली आहे मात्र महिलांना ३ किलोमीटर डोंगर चढून पाणी डोक्यावर आणणे अशक्य आहे. त्या मुळे पिण्याच्या पाण्याची समस्या या वाडीत 'आ' वासून आता पर्यंत कायम उभी आहे.
येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण व नागरिकांना रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने शेती करणे, शेळ्या पाळणे किंवा घाटमाथ्यावरील आळेफाटा-बनकरफाटा-मंचर या ठिकाणी रोजंदारीवर कांदे काढण्या साठी जाऊन आपल्या कुटुंबाचा कसा-बसा उदरनिर्वाह करावा लागत असल्याचे येथील सुशिक्षित तरुणांनी सांगितले.तर अनेक तरुणांचे लग्नाचे वय झाले असून पाण्याच्या समस्ये पाई सोयरीक सुद्धा जुळत नसल्याची खंत या वेळी काही तरुणांनी बोलून दाखवली.
या आदिवासी वस्तीत सरकारच्या कोणत्याही सोई-सुविधा उपलब्ध नसून फक्त भात शेती करून आपल्या पोटाची खळगी भरण्याचे काम आदिवासी बांधव करीत आहेत. लहान मुलांना अंगणवाडी-बालवाडीही नसून शिक्षणाचा मोठा प्रश्न पालकां समोर उभा ठाकला आहे.
या आदिवासी वस्तीत दिप्ती गावकर (बदलापूर) यांच्या प्रेरणा फौंडेशनने राजकारण विरहीत समाजकार्य करीत या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. पाळीव जनावरे व शेळ्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करण्या साठी कोकण टाईप बंधारे बांधून आपले सामाजीक उत्तरदायित्व निभावले असल्याचे येथील आदिवासी बांधव आवर्जून सांगतात.
ही आदिवासी वाडी फांगुळगव्हाण ग्रामपंचायती मध्ये येत असून या भागात पर्यटनाच्या नावाखाली लाखो-करोडो रुपये खर्च करण्यात आलेत मात्र स्थानिक राजकारण्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे येथील आदिवासींना रस्ता, पिण्याचे पाणी, अंगणवाडी ,बेरोजगारी हे प्रश्न सतावत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून येथील समस्यां बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची सामाजीक न्यायचे कार्याध्यक्ष विजय घायवट यांच्या सह भेट घेऊन आदीवासी बांधवाना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय मुरबाड तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड यांनी सांगितले.
मुरबाड तालुक्यात विकासाचा झंजावात सुरू असून आमच्या आदिवासी वस्तीत मूलभूत सोई सुविधा सोडविण्यासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याने आम्ही मुरबाड तालुक्यात राहत आहोत की नाही ? असा संतप्त सवाल मात्र येथील नागरिकांनी व्यक्त केलाय.
Share This