मित्राचा वाढदिवस साजरा करून घराकडे परतत असलेल्या तिघा मित्रांना वाळू वाहतूक करणा-या भरधाव डंपरने धडक दिल्याने एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
विशाल उर्फ विकी रमेश रंधे वय -२५ असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून रोहित दगडू इंगळे वय -२५, उदय भगवान बोदळे वय -२३ अशी आपघातातील जखमींची नावे आहेत.
सिद्धार्थनगर,नशिराबाद येथे राहात असलेले तिघेही मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करून तिघेही मित्र एम एच १९ डी एस ८६९२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून सुनसगाव रोड बालाजी लॉन्स कडून नशिराबादला परत येत होते.
यावेळी जळगावकडून सुनसगावकडे जाणा-या एम एच १९ झेड ४७४८ या क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने विशाल रंधे याचा जागीच मृत्यू झाला. रोहित इंगळे याच्या डोक्याला गंभीर मार लागला. उदय बोदडे याला देखील दुखापत झाली.अपघातातील दोघा जखमींना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले.