वारकरी पतीचं निधन,
पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडला जीव,
हृदयपिळवटून टाकणाऱ्या घटनेनं गावावर शोककळा
नाशिक :- वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे हिरामन पंढरीनाथ देवरे यांचं निधन झालं होतं, पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नीला देखील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचेही निधन झाले आहे.
तासाभराच्या अंतरावरच पती पत्नीचे निधन झाल्याची बाब संपूर्ण जिल्ह्यात पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हिरामन देवरे यांच्यावर आठ दिवसांपासून नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दरम्यान रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते, हीच बाब त्यांच्या गावी म्हणजेच उमराणे येथे कळली, काही वेळेतच ही बाब त्यांची पत्नी विमलबाई देवरे यांना समजली, आणि त्यांना पतीच्या निधनाचा धक्का बसला. पतीच्या निधनाने अश्रु अनावर होत असतांना त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचाही मृत्यू झाला. पती-पत्नीचा तासाभरातच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण उमराणे गावावर शोककळा पसरली आहे.
पती-पत्नी मधील असलेलं प्रेम पाहून उमराणे गावातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. देवरे कुटुंबातील ही दुख:द घटना संपूर्ण गावात पसरली त्यावेळी प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.
देवरे दाम्पत्याचा अंत्यसंस्कार हे उमराणे येथेच करण्यात आले असून दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने उपस्थित असलेल्या व्यक्तीचं मन हेलावून जात असणार.
देवरे कुटुंब हे वारकरी संप्रदायातील असल्याने दिंडीत त्यांचा मोठा सहभाग असल्याचे गावकरी सांगत, देवरे दाम्पत्याचे निधन तेही तासाभराच्या अंतरावर घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पती किंवा पत्नीचे निधन झाल्यास जगणं कठीण होत असतं, अनेकांचे हालही होत असतात, उर्वरित आयुष्य कसे जाणार याचाही विचार केला जातो. पण अशावेळी पतीच्या निधनाचा धसका घेऊन पत्नीनेही प्राण सोडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.