वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्वासराव पवार वय -३२ यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना निधन झाले.
ते जम्मू काश्मीर येथील पूंछ ,राजौरी याठिकाणी १६ मराठा लाईट इन्फ्न्ट्री येथे हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते.
एक वर्षापूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उदमपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलला हलविण्यात आले. नंतर पुणे येथील कमांड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
१४ वर्षापासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. आसाम, ग्वालियर जम्मू काश्मीर या ठिकाणी देशसेवा केली. त्यांचे मूळगाव गुजरवाडी असून त्यांचे कुटूंब व्यवसायानिमित्त वाठार स्टेशन येथे वास्त्व्यास आहेत.
त्यांच्या वडिलांनी सातारा पोलीस दलात कार्य केले होते.
वाठारस्टेशन येथील व्यापा-यांनी बाजारपेठ संपुर्णपणे बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.शोकाकूल वातावरणात ,शासकीय इतमामात विशाल पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी शहीद जवान विशाल पवार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी दुतर्फा उभे राहून फुलांची आदरांजली वाहिली. सातारा पोलीस दल तसेच सैन्य दलातील अधिका-यांच्या वतीने २१ बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी देण्यात आली.