वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे २५ मार्च व २६ मार्च या दोन दिवसात कासव महोत्सवाचे आयोजन…
वेंगुर्ले :-सावंतवाडी वनविभागाच्या वतीने उद्या २५ मार्च व २६ मार्चला वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथे विविध उपक्रमांसह दोन दिवसाच्या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनाऱ्याला कमी अधिक प्रमाणात दुर्मिळ अशा समुद्री कासवांचा (ऑलिव्ह रिडले सी टर्टल) अधिवास आढळून येतो. साधारणतः दरवर्षी ऑक्टोबर ते मे या दरम्यान त्यांचा विनीचा हंगाम असतो. स्वच्छ कमी प्रदुषीत आणि कमी मानवी हस्तक्षेप असणाऱ्या किनाऱ्याची निवड ही कासवे अंडी घालण्यासाठी करतात. एका वेळी १०० ते १५० अंडी घालण्याची क्षमता ही मादी कासवांची असते. अंडी घातल्यानंतर मादी कासवे समुद्रात निघून जातात. त्यानंतर या अंड्यांच्या ५० ते ६० दिवसांच्या उबवण कालावधी मध्ये भटकी कुत्रे, कोल्हे, मुंग्या यांच्याकडून त्यांना धोका असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन सावंतवाडी वनविभाग, स्थानिक कासव मित्र, बीच मॅनेजर यांच्या मदतीने करत असतो.
गतवर्षी कुडाळ वनपरिक्षेत्रातील वेंगुर्ला व मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर मिळून ३२८ इतकी समुद्र कासवांची घरटी संरक्षीत करण्यात आली. त्यातून बाहेर पडलेल्या सुमारे २१४४३ पिल्लांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध समुद्र किनारी वनविभागाच्या माध्यमातून स्थानिकांच्या मदतीने करण्यात येत असलेल्या कासव संवर्धन व संरक्षण कामाची तसेच समुद्र कासवांच्या जीवन चक्राबाबत जनजागृती करून विशिष्ट कामगिरी करणाऱ्या कासव मित्रांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. दोन दिवसाच्या या महोत्सवामध्ये नवजात समुद्री कासवांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, नेचर ट्रेल, मॅग्रुव्ह सफारी तसेच पौराणिक दशावतार (कुर्म अवतार) नाटक इत्यांदी उपक्रमांचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. या महोत्सावाचा आनंद अनुभवण्यासाठी निसर्ग प्रमी तसेच पर्यटकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.