• Total Visitor ( 133955 )

कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा

Raju tapal December 30, 2024 42

हिंदू धर्माची विचारधारा मनामनात रुजविण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले; जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प.तायाराम गुरव यांना प्रदान

कणकवलीत संपन्न झाला वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा

कणकवली:- मला पायीवारीला चालण्याचा योग आला. त्यावेळी एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली. या संप्रदायाची वर्षानुवर्षे , पिढ्यान पिढ्या सुरू असलेली  वारीची विचारधारा,विठ्ठल चरणी असलेली श्रद्धा व भक्ती एका दुसऱ्या प्रति असलेले प्रेम,जिव्हाळा,निस्वार्थ सेवेवरील निष्ठा  यामुळेच पुढे गेली आहे. हिंदू धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदूंच्या मनामनात रुजविण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल तर वारकरी संप्रदायाने केले आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.यावेळी संत सेवा पुरस्कार ह.भ.प.रमाकांत गायकवाड,ह.भ.प. तायाराम गुरव यांना प्रदान करण्यात आला.
   
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायच्या वतीने रविवारी कणकवली वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे ११ वां वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  माजी आमदार वैभव नाईक,तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सिंधुदुर्ग, जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र कदम, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, सचिव राजू राणे,यांच्यासह संतोष राऊळ, गणपत घाडी गावकर, एस.के.सावंत,रामचंद्र गाड ,शामसुंदर कुंभार,विलास राणे, जीवाजी कोळमकर, सत्यवान परब, प्रभाकर सावंत, विनायक मेस्त्री,राजा पडवळ, सर्वोत्तम साटम, दीपक मडवी,नाना गावडे, निवृत्ती मेस्त्री, विजय सुतार, श्रीकृष्ण घाटे, प्रकाश सावंत,आदींसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्याच्या निमित्ताने भालचंद्र महाराज संस्थान ते बाजारपेठ मार्गे सभागृहापर्यंत टाळ मृदंगासह हरिपाठ व हरिनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. यावेळी शहरातील पटवर्धन चौक येथे रिंगण करण्यात आले. यादरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी पुष्पहार अर्पण करून माऊली चरणी लीन झाले. त्यानंतर ही दिंडी कार्यक्रम स्थळी येताच देव विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभंग सादर करत मेळाव्यास सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर,यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडले.

मानवी मनातील अवगुण घालविण्याचे काम वारकरी करतो: कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड 

साधू संतांची शिकवण फार मोठी आहे. ही शिकवण तरुण पिढीला देण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहेत. मानवी मनात जे अवगुण आहेत त्यावर टाळ व मृदुंगाच्या सहाय्याने वार करणारे असे हे वारकरी संप्रदाय आहे. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरव उद्गार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले.

वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेमाचे प्रतीक तहसीलदार दीक्षांत देशपांडे

तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले वारकरी हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होऊन विठुरायाची प्रतिकृती आपल्यासमोर उभे राहते. तसेच प्रचिती मला आज या कार्यक्रमाला आली. वारकरी संप्रदाय हा त्याग व प्रेम या दोन गोष्टींवर उभा आहे.  त्यामुळे या संप्रदायामध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही. असे सांगितले.

Share This

titwala-news

Advertisement