ठाण्यासह ७ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई :- विकेण्डला आता टोपी किंवा स्कार्फ नाही तर चक्क छत्री घेऊन घराबाहेर पडावं लागणार आहे. याचं कारण म्हणजे विकेण्डला ७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाचे तज्ज्ञ सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसात 2 ते तीन डिग्री सेल्सियसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी 42 ते 44 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात 40 ते 42 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकण पट्ट्यात दिवसा उष्ण तर संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.
पुढचे दोन दिवस दिवसा तापमानात 2-3 डिग्री सेल्सियसने वाढ होऊ शकते. तर रात्री तापमाना २-३ डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवस कोणताही बदल होणार नाही. मात्र मे आधीच उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. अवकाळी पाऊस आणि ऊन यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. नागपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावतीमध्ये सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक भागांमध्ये 42 अंशांपेक्षा जास्त तापमान होतं. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवापालट होत आहे.