कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा अखेर सुरू !
महानगरपालिकेची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व पाणीपट्टी देयके अभय योजनेअंतर्गत भरण्याची शेवटची मुदत दिनांक ३१/३/२०२५ पर्यंत आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी अभय योजना राबवूनही कराचा भरणा न करणाऱ्या नागरिकांची/ विविध संस्थांची, मालमत्ता थकाबाकी पोटी सील करण्याची कारवाई महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकाकडे देखील महापालिकेची ४कोटी ४१ लाखांची पाणी देयकांची थकबाकी होती, संबंधित प्राधिकरणास नोटीस बजावून देखील त्यांनी सदर देयकाचा भरणा न केल्यामुळे काल सायंकाळी कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी खंडित केला होता.
तथापि रेल्वे प्राधिकरणाशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी रुपये १ कोटी १७ लाख इतकी रक्कम (current bill) भरण्याची प्रक्रिया सुरू केली आणि देयकाची उर्वरित रक्कम भरणेबाबत आश्वासित केले त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार आज सायंकाळी रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा चालू करण्यात आला.
पाणी देयकाच्या उर्वरित थकाबाकीबाबत येत्या आठवड्यात रेल्वे प्राधिकरणासमवेत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांनी दिली आहे .