मांडा टिटवाळ्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी....?
तब्बल २७ वर्षांपासून बांधकाम विभागात खुर्ची उबविणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच हि दुर्दशा.
शाळकरी विद्यार्थी जातायेत आजही गुडघाभर पाण्यातून
राजू टपाल.
टिटवाळा :- तब्ब्ल एक ते दिड फुट खोलीचे,चार ते पाच फुट रुंदीचे तर पंधरा ते वीस फुट लांबीचे खड्डे हि कुठल्या दुर्गम भागातील रस्त्याची परिस्थिती नसुन स्मार्ट सिटी संबोधल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील मांडा टिटवाळा परिसरातील रस्त्यांची हि दयनीय अवस्था आहे. या परिसरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना व पालकांनाही आजही गुडघाभर पाण्यातूनच चालत जावे हि दयनीय अवस्था झालीय अ प्रभागात गेल्या २७ वर्षांपासून बांधकाम विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळेच. केडीएमसी आयुक्तांनी गणपतीच्या अगोदर सर्व रस्ते खड्डे मुक्त करा असे जरी कितीही आदेश दिले असले तरीही मांडा टिटवाळ्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी....? गणपती बाप्पानाही याहीवर्षी खड्ड्यांतूनच आणावे लागेल का असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांतून विचारला जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण खड्डे सुयोग्य स्थितीत करा अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत घालू असा सज्जड दम दिलेला असतानाही आजही मांडा टिटवाळा विभागातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थेच आहेत. यात प्रामुख्याने टिटवाळा गणपती मंदिर जवळील जावई पाडा येथील वारघडे नगर,मंगल नगर येथेही रस्त्यावरून गुडघाभर पाणयातून शाळकरी विद्यार्थ्यांना कशीबशी कसरत करून चालावे लागत आहे. मांडा पश्चिमेतील वासुंद्री रोड,जानकी विद्यालयाचा परिसर,धनगरवाडी, इंदिरा नगर येथील स्मशानभूमी घोटसई रस्ता ह्या रस्त्याची तर अक्षरशः चाळण झालेली आहे. येथील रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाने ढुंकूनही न पाहिल्यामुळे येथे रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता हा एक संशोधनाचा विषय बनलेला आहे. वाजपेयी चौक ते बल्याणी रोड,निमकर नाका ते आनंद दिघे मार्ग,दळवीवाडा,गणपती मंदिर रोड,रुख्मिणी प्लाझा परिसरातील रस्ते,गणेशवाडी,जुना जकात नाका ते घोटसई फाटा,टिटवाळा गणपती मंदिर ते काळू नदीवरील पूल इत्यादी ठिकाणी तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. याला सर्वस्वी जबाबदार गेल्या २७ वर्षांपासून ठाण मांडून बसलेले
बांधकाम विभागातही उपअभियंता हारून इनामदार हे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत हारून इनामदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याला २७ वर्षे एवढा कालावधी फक्त बांधकाम खात्यात गेलेला नसून टाऊन प्लॅनिंग,पाणी खात्यासह आपण बांधकाम कझाट्यात काम करतोय. आयुक्तांच्या दिलेल्या आदेशानुसार खड्डे भरण्याचे काम सुरु असून सध्य स्थितीत बल्याणी येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून आपण तिथे स्वतः उपस्थित आहोत असे सांगितले. मात्र वारघडे नगर परिसरातील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून जावे लागते त्यासाठी रस्त्याची मंजुरी घेऊन काम करावे लागेल असे सांगितले.
तर अ प्रभागातील बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ओमकार भोईर यांनी सांगितले कि,उल्हास नदीचा ब्रिज,शहाड चा सपना हॉटेल परिसरातील खड्डे,हरी ओम वैली येथील खड्डे भरले असून वाजपेयी चौकातील खड्डे भरण्यासाठी गाडी आली होती. मात्र पावसामुळे खड्डे भरणे कॅन्सल केलेले आहे. तर वारघडे नगर परिसरातील खड्डे काही भरले नसल्याचे त्यांनी सांगितले.