महिलांसाठीच्या योजनेत 'सनी लियोन'ला 1000 रुपये मिळण्याचा नेमका प्रकार काय आहे?
Raju tapal
December 23, 2024
13
महिलांसाठीच्या योजनेत 'सनी लियोन'ला 1000 रुपये मिळण्याचा नेमका प्रकार काय आहे?
छत्तीसगडमध्ये भाजपा सरकारची महत्त्वाकांक्षी 'महतारी वंदन योजना' सुरू आहे. या योजनेअंतर्गत सनी लिओन नावाच्या महिलेला देखील दरमहा एक हजार रुपये मिळत आहेत. (महतारी म्हणजे आई किंवा वृद्ध महिला)
छत्तीसगड सरकारच्या वेबसाईटवर जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तरमधील तलूर अंगणवाडीत हा अर्ज नोंदवण्यात आला आहे.
सरकारच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार, अंगणवाडी आणि पर्यवेक्षकांनी सनी लिओन यांचे पती जॉनी सिन्स यांचा MVY006535575 हा नोंदणी क्रमांक सत्यापित केला आहे.
तसंच यावर्षी मार्च महिन्यापासून स्टेट बँक ऑफ इंडियातील xxxxx76531 या त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत.
या महिन्यातही त्यांच्या बँक खात्यात एक हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
अजय चंद्राकर भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि राज्यातील प्रवक्ते आहेत. त्यांनी मात्र यात कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार असल्याची बाब नाकारली आहे.
त्यांनी सांगितलं की, "हे बस्तरमधील पारंपरिक नाव नाही. मात्र बस्तरमध्ये धर्मांतर होत असतं. त्यामुळे असं होऊ शकतं की, एखाद्या धर्मांतर केलेल्या महिलेचा नाव सनी लिओन असेल. या गोष्टीकडे कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरप्रकार म्हणून पाहता कामा नये."
ही माहिती समोर आल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षानं छत्तीसगड सरकारवर टीका केली आहे.
सुशील आनंद शुक्ला छत्तीसगडमधील काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत.
त्यांनी सांगितलं की, "आमचा पक्ष सुरुवातीपासून सांगतो आहे की, ही एक भ्रष्टाचाराची योजना आहे. गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचत नाही. उलट भाजपाच्या लोकांच्या खिशात पैसा जातो आहे."
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारनं म्हटलं आहे की 75 लाख महिलांच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा केले जात आहेत.
मात्र वस्तुस्थिती अशी आहे की फार तर 20 ते 25 लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो आहे आणि त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत.
सुशील आनंद शुक्ला म्हणाले की, ही योजना म्हणजे भाजपा सरकारच्या भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं उदाहरण आहे.
महतारी वंदन योजना काय आहे?
गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला होता. भाजपला विजय मिळण्यामागे ही योजना एक महत्त्वाचं कारण होती असं मानलं जातं.
निवडणुकीच्या काळातच भाजपानं महिलांकडून या योजनेसाठी फॉर्म भरवून घेण्यास सुरुवात केली होती.
त्यांनी मतदारांना सांगितलं होतं की जर ते सत्तेत आले तर 'महतारी वंदन योजने'अंतर्गत ते प्रत्येक विवाहीत महिलेला दरमहा एक हजार रुपये देतील.
या वर्षी मार्च महिन्यापासूनच छत्तीसगड सरकारनं विवाहित महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे.
छत्तीसगड सरकारनं दावा केला आहे की मार्च 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान 70 लाख महिलांच्या बँक खात्यात एकूण 6530.41 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
Share This